facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / पुणे / महापौरांना घाई झाली होती

महापौरांना घाई झाली होती

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) ग्रीन सिग्नल येईपर्यंत महापौरांनी जरा थांबावे, असे त्यांना सांगितले होते. मात्र, त्यांना मेट्रोच्या भूमिपूजनाची घाई झाली होती,’ असा टोला पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापौर प्रशांत जगताप यांना लगावला. हा पुणेकरांचा कार्यक्रम आहे; त्यामुळे त्यात कोणीही राजकारण करू नये, असा सल्लाही महापौरांना देण्यास ते विसरले नाहीत.

पंतप्रधान कार्यालयाकडून ‘मेट्रो’च्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमातील निमंत्रितांची नावे अंतिम झाल्यानंतरच जाहीर करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शनिवारी भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. जगताप यांना ‘मेट्रो’चे भूमिपूजन करण्याची खूपच घाई झाली आहे; त्याला कोण, काय करणार, अशी कोपरखळी बापट यांनी मारली.

‘महापालिकेने पवार यांच्या नावाचा ठराव केला होता. त्याचा नक्कीच विचार करण्यात आला होता. तसे पंतप्रधान कार्यालयाला कळवले असल्याचेही महापौरांना सांगितले होते. मात्र, त्यांना फारच घाई झाली होती. हा नागरिकांचा कार्यक्रम आहे. त्यात कोणीही राजकारण करू नये. पुणेकर जनता सुज्ञ असून, भारतीय जनता पक्षानेच ‘मेट्रो’चा प्रश्न मार्गी लावल्याची त्यांनी माहिती आहे,’ असा चिमटाही बापट यांनी काढला.

मोदी यांच्या उपस्थितीत शनिवारी (२४ डिसेंबरला) पुणे मेट्रोचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमात दोन्ही महापालिकांचे महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लोकसभेचे पुण्यातील खासदारांचाही सहभाग असणार आहे, असे बापट यांनी सांगितले. महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी मोदींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचे महापौरांनी मंगळवारी जाहीर केले होते. शहरात मेट्रो प्रकल्प आणण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न केले. मात्र, केंद्रात आणि राज्यात सरकार असल्याने आम्हीच तो मार्गी लावला, असा डांगोरा पिटून राजकारण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा आरोप महापौरांनी केला होता.

व्यासपीठावर शिवसेनेचे खासदारही
भूमिपूजनाच्या कार्यक्रमात लोकसभेचे खासदार हजेरी लावणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे यांनाही व्यासपीठावर स्थान देण्यात येणार आहे. मात्र, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आलेले नाही.

सभेची जय्यत तयारी
कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मोदी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. या सभेला लाखोंच्या संख्येने गर्दी करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी रात्री सभेच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन केले होते. खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, सर्व आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *