facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / मुंबई / महिलांचा लोकलप्रवास होणार निर्धोक!

महिलांचा लोकलप्रवास होणार निर्धोक!

महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी टॉक बॅक यंत्रणा मार्चपर्यंत सुरू करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. आपत्कालीन स्थितीत गार्डशी तातडीने संपर्क साधण्याच्या हेतूने टॉक बॅक प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. सध्या दोन लोकलमधील महिलांच्या सर्वच डब्यांमध्ये ही अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येत आहे.

लोकल प्रवासात आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास पोलिस हेल्पलाइनप्रमाणेच टॉक बॅकचा पर्याय देण्यात येण्यासाठी पश्चिम रेल्वेने प्रयत्न चालवले आहेत. मेट्रोमध्ये ही यंत्रणा कार्यरत असून त्याच धर्तीवर महिलांच्या डब्यांमध्ये टॉक बॅक यंत्रणा बसवण्याचे काम महालक्ष्मी रेल्वे कार्यशाळेत हाती घेण्यात आले आहे. महिला प्रवाशांना सुरक्षा पुरवण्यात कोणतीही अडचण निर्माण न होण्याच्या दृष्टीने टॉक बॅक यंत्रणेसाठी प्राधान्य देण्यात येत आहे. साधारण २५ लाख रुपये खर्च करून प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा बसविली जाणार आहे. उपनगरीय सेवेत ही यंत्रणा प्रथमच बसविण्यात येत आहे.

अशी आहे यंत्रणा

महिलांच्या डब्यात दरवाजाशेजारी एक काळे बटण बसविले जाईल. आपत्कालीन स्थितीत हे बटन दाबून डब्यातील महिलांना थेट गार्डशी संपर्क साधता येईल. गार्डकडे असणाऱ्या पॅनेलवर नेमक्या कोणत्या डब्यातून कॉल आला हे समजण्यास मदत होणार आहे. तसेच, टॉक बॅक यंत्रणा ध्वनीक्षेपकाने जोडण्यात आली आहे. हेल्पलाइनवर तक्रार नोंदवण्यात मोबाइलची रेंज मिळण्यापासून अडचणी येतात. अशावेळी, टॉक बॅकमुळे संबंधित लोकलमध्ये निर्माण झालेल्या स्थितीचा अंदाज घेत गार्डकडून मदतीसाठी तात्काळ निर्णय घेणे शक्य ठरेल, असा हेतू आहे. या स्थितीत, गार्ड मुख्य नियंत्रण कक्ष, मोटरमनशी संपर्क साधून त्याची माहिती, आढावा घेऊ शकतात. त्यातून परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

टॉक बॅकप्रमाणेच पश्चिम रेल्वेने महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे कामही वेगाने सुरू केले आहे. महिलांच्या ५० डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे पुरविण्यात येणार आहेत. आता पहिल्या टप्प्यात सात गाड्यांमधील २१ डब्यांमध्ये हे कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. इतर डब्यांमधील कामही फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

पश्चिम रेल्वेने दोन लोकलमधील महिलांच्या सहा डब्यांत टॉक बॅक यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेतले आहे. मार्चपर्यंत प्रत्यक्षात ही सेवा कार्यरत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाच्या अनुषंगाने या सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *