facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / ९० कोटींची ऊसबिले बँकेतच

९० कोटींची ऊसबिले बँकेतच

ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर पाठोपाठ झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे नोव्हेंबरमध्ये गाळप झालेल्या ऊसाची ८९ कोटी २२ लाख रुपये जिल्हा बँकेच्या खात्यातच पडून आहेत. नोव्हेंबरमधील दुसऱ्या पंधरवड्यातील बिले जमा होऊ लागली असून या आठवड्यात ६७ कोटी २० लाख रुपये आणखी जमा होणार आहेत. जिल्हा बँकेत खाते असलेल्या सात साखर कारखान्यांची ही परिस्थिती असून १४ कारखान्यांची बिले विविध बँकांमधून जमा होत आहेत. त्यांचीही हीच अवस्था आहे.

ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर दर पंधरा दिवसांनी ऊस बिल द्यायचे या नियमाप्रमाणे कारखाने आपापल्या बँकांतील खात्यांवर रक्कम जमा करतात. त्यानुसार दोन टप्प्यातील बिलांची प्रक्रिया कारखान्यांनी पूर्ण केली. जिल्हा बँकेकडे बिद्री, भोगावती, राजाराम, आजरा, गडहिंग्लज, घोरपडे, फराळे कारखान्यांची खाती आहेत. या कारखान्यांची ​पहिल्या टप्यातील बिले खात्यात जमा झाली आहेत. पहिल्या पंधरवड्यात गाळप कमी झाल्याने ​बिलाची रक्कम कमी दिसत आहे. या कारखान्यांची ४७ कोटी २५ लाखांची ​बिले जमा झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील काही कारखान्यांनी बिले जमा केली आहेत. गडहिंग्लज, घोरपडे व फराळे या कारखान्यांची दुसरी बिलेही जमा झाली आहेत. उर्वरित चार कारखान्यांची बिले जमा होण्याची प्रक्रिया सुरु आहे.

दुसऱ्या टप्प्यातील ४१ कोटी ९७ लाख रक्कम बँकेत जमा झाली आहे. ६७ कोटी २ लाख रुपयांची बिले जमा होणार आहेत. बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना हे व्यवहार दिसत आहेत. मात्र ज्या शाखेत खाते आहे त्या शाखेत सर्वांसाठी म्हणून दोन लाखांची रक्कम येते. यातून दोनपासून जास्तीत जास्त पाच हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. हे प्रमाण जमा झालेल्या रकमेच्या तुलनेत तुरळक आहे. याबरोबर दूध बिलेही जमा झाली आहेत. चार बिले खात्यांवर जमा झाली आहेत. त्यातून दिडशे कोटीपर्यंतची बिले अडकली आहेत. अजूनही जिल्हा बँकेला करन्सी चेस्टकडून तुलनेने पैसे मिळालेले नाहीत. पैशाची परिस्थिती सुधारण्यास पुढील महिना लागेल, असे दिसते.

रब्बीचे केवळ ११ कोटी जमा

रब्बी हंगामासाठी दरवर्षी ६०० कोटींचे कर्ज जिल्हा बँकेतून दिले जाते. यंदाही ते उद्दिष्ट ठेवून बँकेने कर्ज मंजुरी दिली आहे. गाळप हंगाम सुरू झाला की रिकामे असलेल्या शेतांत रब्बी पिके घेतली जातात. त्याच्या तयारीसाठी पैसे लागतात. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असताना मात्र अजूनही कर्ज उपलब्ध होत नाही. आतापर्यंत मागणी केल्याप्रमाणे बँकेने ११ कोटी ५२ लाखांची रक्कम कर्जासाठी खात्यांवर जमा केली आहे. त्यातूनही अगदी किरकोळ रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडली आहे.

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *