facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळावी म्हणून प्रमुख चार मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत मी स्वाभिमानी कारखानदार संघटनेच्यावतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या इचलकरंजी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात शहरातील सर्वच व्यवहार बंद राहिल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस प्रशासनानेही ठिकठिकाणी कडक बंदोबस्त तैनात केला होता.

आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडलेल्या यंत्रमाग व्यवसायाला सरकारकडून ठोस उपाययोजना करून नवसंजीवनी मिळावी यासाठी मी स्वाभिमानी कारखानदार संघटनेच्यावतीने सहा दिवसांपासून संतोष कोळी ऊर्फ बाळ महाराज व अमोद म्हेतर बेमुदत उपोषणास बसले आहेत. आर्थिक टंचाईमुळे मेटाकुटीला आलेल्या यंत्रमागधारकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आपले कारखाने बंद ठेवल्याने यंत्रमागाचा खडखडाट बंद झाला आहे. या आंदोलनांतर्गत गुरुवारी इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली होती.

बंदला सकाळपासूनच शहर व परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने प्रमुख मार्गासह भागाभागातील सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. यंत्रमागधारकांच्यावतीने मोटारसायकल रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात येत होते. त्यालाही व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांनी प्रतिसाद देत व्यवहार बंद ठेवले. दरम्यान, मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे शॉपिंग सेंटर व गांधी पुतळा परिसरात फळविक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण केला गेला नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनानेही कडक बंदोबस्त तैनात केला होता. त्यामध्ये दोन स्ट्रायकिंग फोर्स, विशेष कृती दलाचा समावेश होता.

दरम्यान, गुरुवारी दिवसभरात आमदार राजेश क्षीरसागर, किराणा व्यापारी असोसिएशन, कडेगाव पॉवरलूम असोसिएशन, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती संघटना यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला.
आज किल्ली मोर्चा

यंत्रमाग व्यावसायिकांना सरकारकडून कोणत्याही सवलती मिळत नसल्याने हा उद्योग मोडकळीस आला आहे. मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी मी स्वाभिमानी कारखानदार संघटनेच्यावतीने बाळ महाराज यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे, पण सरकारने केवळ आश्वासने देऊन या उद्योगाची चक्रे थांबविण्याचा प्रयत्न केल्याने गेल्या सहा दिवसांपासून यंत्रमागमागांचा खडखडाट ठप्प झाला आहे. कारखाने बंद असल्याने हजारो कामगारांच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न ‘आ’वासून उभा ठाकला आहे या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता.२३) सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी कार्यालयावर यंत्रमागधारकांचा किल्ली मोर्चा काढण्यात येणार आहे. बंद असलेल्या कारखान्याच्या चाव्या प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना देण्यात येतील. गांधी पुतळ्यापासून निघणारा हा मूकमोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर जाणार आहे. यात हजारो कारखानदार सहभागी होणार आहेत.

पोलिसांना धसका !

यंत्रमागधारकांच्या विविध मागण्यांप्रश्नी सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस लांबत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्याने सरकारस्तरावर सध्या तरी कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. बेमुदत उपोषणामुळे गांधी पुतळा परिसरात कारखानदारांच्या लक्षणीय उपस्थितीमुळे काही प्रमाणात तणाव दिसू लागतो, आणखी किती दिवस उपोषण सुरू राहणार यावरच सर्व काही अवलंबून आहे, पण या आंदोलनाचे दिवस वाढतील तसा पोलिसांवरील ताणही वाढत आहे त्यामुळे पोलिसांनी बाळ महाराजांच्या उपोषणाचा चांगलाच धसका घेतला आहे.

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *