facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / नागपूर / मनोरुग्णांच्या पंक्तित नातेवाइकांची सेवा

मनोरुग्णांच्या पंक्तित नातेवाइकांची सेवा

ऐन तारुण्यात बिघडलेले मानसिक असंतुलन, नैराश्य, एकलकोंडेपणा, व्यसनाधीनता, संशयी वृत्ती अशा कारणांमुळे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. उतारवयात स्मृतिभ्रंश आणि पार्किन्सनमुळे रुग्ण खचतो. अशा वैफल्यग्रस्तांसाठी कोराडी मार्गावरील प्रादेशिक मनोरुग्णालय उमेदीचा किरण देणारा एकमेव आधार आहे. एकदा येथे आल्यानंतर रुग्णांचे कुटुंबात पुन्हा समायोजन होत नाही. ही गरज लक्षात घेता प्रादेशिक मनोरुग्णालयाने नातेवाइकांना उपचार प्रक्रियेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मानसिक वैफल्यग्रस्तांवर उपचार करीत असताना औषधांइतकेच शुश्रूषेला महत्त्व असते. रुग्णांना मानसिक आधार मिळाला तर त्याच्या सुधारण्याची प्रक्रिया आणखी सोपी आणि सहज होते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना उपचार प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. जेणेकरून रुग्णाचे समाजात पुन्हा समायोजन व्हावे, ही त्यामागची भूमिका आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांना रोज एकवेळ नाश्ता, दोन वेळचे जेवण दिले जाते. नेमकी हीच वेळ साधून दुपारच्या वेळी रुग्ण जेवण्यासाठी ताटावर बसल्यानंतर त्यांना वाढण्यासाठी नातेवाइकांची मदत घेतली जात आहे. रुग्णांना येथे सकस आहार मिळत नाही, अशीही नातेवाइकांची तक्रार असते. त्यावरही यातून मात करणे शक्य होणार आहे. रुग्णाच्या ताटापर्यंत जाणाऱ्या अन्नाचा दर्जा नातेवाइकांना पाहता येणे शक्य होणार आहे.

कुटुंबातली एखादी व्यक्ती समोर वाढताना दिसत असेल तर अशा रुग्णांना मानसिक आधार मिळावा, यासाठी हा प्रयत्न केला जाणार आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे यांनी याला दुजोरा दिला आहे.

१०६ पदे रिक्त

प्रादेशिक मनोरुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून अपुऱ्या मनुष्यबळाचा ताण सोसत आहे. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची सात पदे रिक्त आहेत. यात प्रामुख्याने मनोविकृतीशास्त्र विषयातील चार पदे मंदूर होऊनही रिक्त आहेत. मनोरुग्णालयाला कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षकदेखील सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला नियुक्त करता आलेला नाही. येथील कारभार प्रभारी वैद्यकीय अधीक्षकावर टाकला जात असल्याने चतुर्थश्रेणीपासून कोणावरही वचक राहिलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे येथे मानसोपचारतज्ज्ञाची नितांत गरज असतानाही हे पद सरकारला भरता आलेले नाही. लिपिक दर्जापासून ते रुग्णांची शुश्रूषा करण्यासाठी १०६ पदे रिक्त असल्याने आहे त्या मनुष्यबळावर दिवस काढले जात आहेत.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *