facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / पुणे / ‘संत तुकाराम’चे दुर्मिळ छायाचित्र उजेडात

‘संत तुकाराम’चे दुर्मिळ छायाचित्र उजेडात

मराठी बोलपटांच्या पहिल्या शृंखलेतील ‘संत तुकाराम’ या चित्रपटाचे दुर्मिळ छायाचित्र नुकतेच उजेडात आले आहे. या शिवाय जॉयमती या पहिल्या आसामी चित्रपटाचे छायाचित्र, जयललिता यांचे शहजादी मुमताज या चित्रपटातील छायाचित्र आणि अमिताभ बच्चन यांच्या अप्रदर्शित जमानत या चित्रपटाचे पोस्टर्स उजेडात आले आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफएआय) हा ठेवा प्राप्त झाला असून, छायाचित्रे डिजिटाइज करण्याचे काम सध्या सुरू आहे.
चित्रपट संग्रहालयाला या वर्षभरात साडेसात हजार दुर्मिळ छायाचित्रे, चार हजार पोस्टर्स आणि अडीच हजार गाण्यांची पुस्तके मिळाली आहेत. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मगदूम म्हणाले, की ‘आम्ही केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाशी संबंधित असलेला दुर्मिळ ठेवा रसिक संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी देत आहेत. त्यामुळे संग्रहालयाकडे असलेल्या साहित्यात भर पडत आहे. सध्या संग्रहालयाकडे दीड लाख छायाचित्रे, २७ हजार पोस्टर्स आणि १७ हजार गाण्यांची पुस्तके असा ठेवा उपलब्ध आहे. हा ठेवा डिजिटाइज करण्याचे काम सध्या सुरू असून, लवकरच तो टप्प्याटप्प्याने वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल.’

बाबजीराव राणे दिग्दर्शित संत तुकाराम हा चित्रपट १९३२ मध्ये प्रदर्शित झाला होता. अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट प्रभात कंपनीने याच वर्षात प्रदर्शित केला. त्यानंतर चार वर्षांनी प्रभातचा संत तुकाराम चित्रपट आला. १९३२ मध्ये प्रदर्शित झालेल्या संत तुकाराम चित्रपटाची फारशी माहिती उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे दुर्मिळ छायाचित्र हा अमूल्य ठेवा आहे. तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचे शहजादी मुमताज या १९७७ मधील चित्रपटातील छायाचित्र, १९३५ मधील जॉयमतीचे छायाचित्र आणि जमानत या अप्रदर्शित चित्रपटाचे पोस्टर आता संग्रहालयात दाखल झाले आहे.

घटक यांच्या चित्रपटांचा ठेवा
ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्या तीन अपूर्ण बंगाली चित्रपटांची चित्रफित संग्रहालयाला मिळाली आहे. १९५९ ते १९७१ या कालावधीतील ‘काटो अजनारे’, ‘बंगार बंगा दर्शन’ आणि ‘रंगेर घुलम’ या चित्रपटांचा त्यात समावेश आहे. ‘ तिताश एक नदी का नामक’ या घटक यांच्या १९७३ मधील चित्रपटाची माहिती पुस्तिका संग्रहालयाला मिळाली आहे. पश्चिम बंगाल सरकारचा माहिती व सांस्कृतिक विभाग तसेच ऋत्विक घटक ट्रस्टकडून हा ठेवा मिळाला आहे, असे प्रकाश मगदूम यांनी सांगितले. दुर्मिळ चित्रठेवा संग्रहालयाला मिळण्यासाठी कर्नाटक, केरळ या राज्यांशी बोलणी सुरू असल्याचे ते म्हणाले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *