facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / नागपूर / हमखास पैसे देणारे एटीएम

हमखास पैसे देणारे एटीएम

नोटाबंदीच्या घोषणेनंतर आजकाल एटीएमवर हमखास पैसे मिळणे जरा कठीणच झाले आहे. एटीएमवर जाणाऱ्यांना अनेकदा रिकाम्या हाताने परतावे लागते. हीच बाब ओळखून एका शिक्षिकेने एटीएमचे विज्ञान मॉडेल तयार केले आहे. यातून चक्क एक व दोन रुपयांची नाणी तसेच १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा बाहेर येतात. रामण विज्ञान केंद्र आणि एअरोनॉटिकल सोसायटी ऑफ ‌इंडियाच्यावतीने आयोजित ऑरेंजसिटी विज्ञान मेळाव्यात एका शिक्षिकेने हे मॉडेल सादर केले असून, त्याची सर्वाधिक
चर्चा आहे.

२२ ते २४ डिसेंबरदरम्यान या ऑरेंजसिटी विज्ञान मेळाव्याचे आयोजन रामण विज्ञान केंद्रात करण्यात आले आहे. या मेळाव्यादरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विज्ञान प्रदर्शन तसेच शिक्षण सामग्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यात ५४ शाळांचे १३० विद्यार्थी आणि २० शिक्षकांनी तयार केलेले मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. यातच स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूलच्या शिक्षिका मेघा बेरी यांनी एटीएमचे मॉडेल तयार केले आहे. याबाबत बेरी म्हणाल्या, ‘या मॉडेलमध्ये नाणे आणि नोटा असे दोन भाग करण्यात आले आहेत. नाण्याच्या भागात एटीएम कार्ड घातल्यास नाणे बाहेर येतात. नोटांच्या भागात १०, २० आणि ५० असे तीन विविध भाग करण्यात आले आहेत. यातील ज्या भागात आपण एटीएम कार्ड घालू, त्यातून त्या मूल्याची नोट बाहेर येते. एटीएममधील प्रक्रिया नेमकी कशी चालत असावी, याचा अंदाज देणारे हे मॉडेल आहे.’ केवळ एटीएममधील प्रक्रिया सांगणारे हे मॉडेल असले तरी एटीएमसमोरील रांगा आणि अनेकदा त्यातून होणाऱ्या त्रासाला सर्वसामान्य माणूस तोंड देत असल्याने बेरी यांच्या मॉडेलसमोर बघ्याची गर्दी दिसून येते. एअरोनॉटिकल सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल आर. के. एस शेरा यांच्या हस्ते बुधवारी या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रामणचे प्रकल्प समन्वयक एन. रामदास अय्यर, अभिमन्यू भेलावे आदी मान्यवर उपस्थित होते.

रोज एक वाटी वरण खा!

बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या एका सत्रादरम्यान पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना ‘आंतरराष्ट्रीय डाळींचे वर्ष’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘पॅक फूड हे बनवायला सोपे आणि खायला चविष्ट असले तरी ते आरोग्याकरिता हानीकारक आहे. आज कापलेल्या कोंबड्यावर प्रक्रिया करून तो दोन महिन्यांनंतर खाण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा मुलांनी पॅक फूडकडे पाठ फिरवावी आणि रोज किमान एक वाटी वरण खायलाच हवे.’

पृष्ठापासून मोबाइल चार्जिंग

पृष्ठाच्या छोट्या तुकड्यांचा वापर करून त्याद्वारे उर्जा तयार करण्याचा प्रयत्न श्री निकेतन माध्यमिक विद्यालयाचा श्रेयस येनूरकर आणि त्याच्या साथीदारांनी केला आहे. पृष्ठाचे तुकडे विद्युतरोधक असले तरी या तुकड्यांमध्ये व्हिनेगरचे द्रव्य घातल्यास ते विद्युतवाहक बनतात. या तुकड्यांचा योग्य वापर केल्यास त्याद्वारे मोबाइल चार्ज करता येतो, असा दावा या प्रयोगाद्वारे करण्यात आला आहे.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *