facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / Featured / इएसआय हॉस्पिटल केंद्र सरकार चालवणार

इएसआय हॉस्पिटल केंद्र सरकार चालवणार

आवाज न्यूज नेटवर्क – 

कोल्हापूर – राज्य सरकारच्या अनास्थेमुळे गेली २० वर्षांहून अधिक काळ बंद असलेले इएसआय (कामगार राज्य विमा महामंडळ) हॉस्पिटल १ मेपासून केंद्र सरकार चालविणार आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या कामगार राज्य विमा महामंडळ समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत खैरे यांनी ही घोषणा केली. तत्पूर्वी खैरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत दोन तास हॉस्पिटलची पाहणी केली.

कोट्यवधींची गुंतवणूक असलेल्या या रुग्णालयाचा लाभ गरजूंना होत नसल्यामुळे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरु व्हावे, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत पाठपुरावा केला होता. जिल्ह्यातील सुमारे ५२ हजार कर्मचारी सदस्य आणि आणि त्यांच्या कुटुंबीयांना या हॉस्पिटलचा लाभ होणार आहे.

सर्किट हाउसजवळ १५ एकर जागेत इएसआय हॉस्पिटलचा परिसर आहे. १९९७ मध्ये तब्बल १० कोटी रूपये खर्च करून, नऊ एकर जागेवर शंभर बेडचे हॉस्पिटल बांधण्यात आले. मात्र ते आजतागायत ते बंदच होते. त्यामुळे मोठ्या उपचारासाठी कर्मचाऱ्यांना बाहेर जावे लागत होते.

यासंबंधी खासदार य महाडिक यांनी, २७ जुलैमध्ये संसदेत प्रश्न उपस्थित करून हे हॉस्पिटल तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती.

हॉस्पिटलच्या लाभासाठी कर्मचाऱ्यांकडून दरवर्षी सुमारे ३ कोटींचा निधी कपात केला जातो. त्यामुळे हे हॉस्पिटल केंद्र सरकारने सुरु करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी खासदार खैरे यांनी भेट देऊन हॉस्पिटलची पाहणी केली.

यावेळी खैरे म्हणाले, ‘कोल्हापूरसह राज्यात चार ठिकाणी इएसआय हॉस्पिटल्स आहेत. ती चालवण्यासाठी केंद्र सरकार राज्याला भरीव निधीही देते. मात्र या निधीचा वापर राज्य सरकारकडून होत नसल्यामुळे हॉस्पिटलची दुरवस्था झाली आहे. यापुढे केंद्र सरकारच्या इएसआय कॉर्पोरेशनच्यावतीने कोल्हापुरातील हे हॉस्पिटल चालवण्यास घेईल. १ मे पासून ते पूर्ण क्षमतेने सुरु होईल.’

इएसआय हॉस्पिटलशी संबंधित ज्या खासगी रुग्णालयांचे करार संपले आहेत त्या करारांचे पुनरुज्जीवन करण्यात येईल, असेही खासदार खैरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी समीर शेठ, दीपक साठे, दिलीप पाटील, संदीप कुमार, सुरेश पाटील, के. डी. थोरात, ए. जी. जोशी, पी. बी. हरळीकर, शेखर सुतार, सर्जेराव यादव, राजाराम पाटील उपस्थित होते.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *