facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / दुष्काळ अनुदान घोटाळ्यात गुन्हे

दुष्काळ अनुदान घोटाळ्यात गुन्हे

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – दुष्काळाने देशोधडीला लागलेले कुटुंब, वाढत्या शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने दुष्काळी अनुदान जाहीर केले. मात्र, निबर कातडीच्या अधिकाऱ्यांनी इथेही मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार केला. याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उमटले. या घोटाळ्याची सखोल चौकशी करून आठ दिवसांत दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले.
मराठवाड्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नैसर्गिक आपत्तीने सैरभैर झालेल्या शेतकऱ्यांना आधार म्हणून सरकारने दुष्काळी अनुदानाची घोषणा केली. पंचनाम्यानंतर अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्याला दोन वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र पैठण, गंगापूर तालुक्यात या निधीवर डल्ला मारण्याचा संतापजनक प्रकार घडला. हा घोटाळा आमदार अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दुष्काळी अनुदान वाटप करताना प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला. ज्यांच्या नावावर जमीन नाही त्यांनी दुसऱ्याचा सातबारा वापरून अनुदान लाटले. ज्यांच्यावर कर्ज नाही अशा लोकांनाही तब्बल १६ लाखांपर्यंतचे अनुदान वाटप झाले. जमीन नसतानाही बँकेत खाते उघडून अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली. हे प्रकार ऐकताच पालकमंत्री कदम संतप्त झाले. ‘ज्यांची जमीन नाही त्यांना अनुदान मिळते कसे ? अनुदान वाटपात झालेला घोळ गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या अनुदानाचा घोळ करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. जे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले असतील त्यांच्या अनुदानाची अधिकाऱ्यांकडून वसुली करण्यात येईल. या गैरव्यवहार प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात चौकशी करावी,’ असे आदेश त्यांनी दिले.

एक कोटीचा घोटाळा.

‘जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी दुष्काळी अनुदान वाटपाची फेर चौकशी केली आहे. यात सुमारे १ कोटीचा घोटाळा असल्याचे आढळून आले आहे,’ अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *