facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / पुणे / ‘पायाभूत सुविधांसाठी नागरिकांनी पुढे यावे’

‘पायाभूत सुविधांसाठी नागरिकांनी पुढे यावे’

‘सद्य परिस्थितीत उपलब्ध असलेल्या पायाभूत सोयीसुविधा वाहतुकीचा ताण घेण्यास सक्षम नाहीत. ‘व्हिजन २०३५’ अंतर्गत सादर केलेले ट्रान्सपोर्ट व्हिजन डॉक्युमेंट लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात हे व्हिजन प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तंत्रज्ञांबरोबरच संबंधित सरकारी यंत्रणा आणि नागरिकांनी देखील पुढे येण्याची गरज आहे,’ असे मत ‘टायफॅक’चे (टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अँड अॅसेसमेंट कौन्सिल) अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’च्या (एआरएआय) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘ट्रान्सपोर्ट व्हिजन कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते. या वेळी ‘ट्रान्सपोर्ट व्हिजन डॉक्युमेंट २०३५’ चे अनावरण करण्यात आले. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) संचालक डॉ. अश्विनीकुमार नांगिया, ‘टायफॅक’चे कार्यकारी संचालक डॉ. प्रभात रंजन, ‘ट्रान्सपोर्ट व्हिजन २०३५’ चे प्रमुख गौतम गोस्वामी, या व्हिजनच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत मराठे, ‘एआरएआय’च्या संचालिका रश्मी उर्ध्वरेषे आदी या वेळी उपस्थित होते.
‘आज भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. वाहतूक व दळणवळण अधिक वेगवान व सुरक्षित होणे गरजेचे आहे. मात्र, त्यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला पाहिजे. वैयक्तिक वाहनांचा वाढलेला वापर व दुर्लक्षित असलेली सार्वजनिक व्यवस्था, यामुळे सध्याच्या पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. भविष्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देणे गरजेचे आहे. तसेच, तुलनेने अतिशय स्वस्त असलेल्या रेल्वे आणि जलवाहतुकीकडे सक्षम पर्याय म्हणून पाहिले पाहिजे,’ असे डॉ. काकोडकर म्हणाले.
गेल्या तीन दशकांत वाहन उद्योगा वाढला आणि त्याबरोबरच वाहतुकीच्या समस्याही वाढल्या. सर्वच शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी सर्वंकष वाहतूक धोरणाची गरज आहे. सध्या सार्वजनिक वाहतुकीतील घटक एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत. तसे न होता या घटकांनी एकमेका सहकार्य केल्यास परिस्थितीत बदल होऊ शकतो, असे डॉ. मराठे म्हणाले.

या वेळी ‘एआरएआय’ची गेल्या ५० वर्षांची कामगिरी दर्शविणारे एक प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते. डॉ. काकोडकर व इतर मान्यवरांनी त्यास भेट दिली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *