facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / Featured / पासपोर्टला ‘आधार’चा आधार

पासपोर्टला ‘आधार’चा आधार

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – पासपोर्टसाठी जन्मतारखेचा पुरावा देण्यासाठी नागरिकांची होणारी धावपळ आता संपणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टसाठीचे नियम शिथिल केले असून, जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स ग्राह्य धरले जाणार आहे. येत्या २६ डिसेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत.

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री (निवृत्त) जनरल व्ही. के. सिंह यांनी पासपोर्टशी संबंधित नव्या नियमांची माहिती शुक्रवारी जाहीर केली. १९८९नंतर जन्मलेल्या अर्जदारांना जन्मदाखला देणे आतापर्यंत बंधनकारक होते. तसेच त्यापूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना शाळेचा दाखला किंवा अॅफिडेव्हिट द्यावे लागत होते. जुने नियम शिथिल करून मंत्रालयाने सरसरकट सगळ्यांना एकच नियम जाहीर केला आहे. यापुढे जन्मतारखेचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एलआयसी पॉलिसी यांपैकी कोणतेही कागदपत्र चालणार आहे.

सध्या देशभरात एक अब्जाहून अधिक नागरिकांकडे आधार कार्ड आहे. या कार्डामुळे अनेक सरकारी सेवा आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा फायदा त्यांना मिळत आहे. आता पासपोर्टसाठीदेखील आधार कार्ड फायदेशीर ठरणार आहे. पासपोर्ट प्रक्रियेमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले असून, पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मंत्रालयाच्या नव्या निर्णयामुळे लाखो अर्जदारांना दिलासा मिळाला आहे. मुख्यतः ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना जन्मदाखला सादर करताना खूप अडचणी येत होत्या. नव्या नियमांमध्ये ‘अॅनेक्श्चर’चे काही प्रकारही करण्यात आले आहेत. अॅफिडेव्हिटचे नियम शिथिल करून यापुढे वैयक्तिक हमीपत्र (सेल्फ डिक्लरेशन) ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे पुणे विभागाचे मुख्य पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी सांगितले.

कोट

परदेशगमनाच्या संधी वाढल्यामुळे पासपोर्ट प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी, यासाठी परराष्ट्र मंत्रालय प्रयत्नशील आहे. गेल्या दोन वर्षांत पासपोर्ट प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले असून, पासपोर्ट अल्पावधीतच नागरिकांच्या हातात मिळतो आहे. या नव्या बदलांमुळे नागरिकांबरोबरचे आमचे काम अधिक सोपे होईल.

अतुल गोतसुर्वे, पासपोर्ट अधिकारी, पुणे विभाग

नवीन नियम

– सरकारी कर्मचाऱ्यांना पासपोर्ट काढण्यासाठी संबंधित मंत्रालय किंवा खात्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते; मात्र ते तातडीने मिळण्यास अडचण येत असल्यास ना हरकत प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाचा पुरावा स्वाक्षरीसह ग्राह्य धरणार.

– साधू-संन्यासींना पासपोर्टवर माता-पित्याच्या नावांऐवजी आपल्या आध्यात्मिक गुरूचे नाव देता येईल; मात्र त्या नावाचे पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र यांपैकी एक पुरावा आवश्यक.

– घटस्फोटित अर्जदाराला मुलांचा पासपोर्ट काढताना एका पालकाचे नाव लिहिण्यास परवानगी.

– आई किंवा व‌डिलांचे नाव पासपोर्टवर नमूद केले जाऊ नये, अशी अर्जदार व्यक्तीची इच्छा असेल तर तीही आता मान्य होणार आहे.

– अर्ज भरताना लागणारे अॅनेक्श्चर ए, सी, टी, ई, जे आणि के यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्याऐवजी नागरिकांकडून ‘सेल्फ डिक्लरेशन’ स्वीकारणार.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *