facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / प्रदूषणात चंद्रपूर पुन्हा ‘टॉप’

प्रदूषणात चंद्रपूर पुन्हा ‘टॉप’

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – राज्यात दीर्घ काळापर्यंत सर्वाधिक प्रदूषित राहिलेल्या चंद्रपुरातील नव्या उद्योगांवरील घालण्यात आलेली बंदी हटविण्यात आली. उद्योगवाढ होऊन प्रदूषणाची मात्रा वाढली. त्याचा परिणाम म्हणून गुरुवारी चंद्रपूर राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून नोंदविण्यात आले. चंद्रपूरचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) हा २५४ होता. ही वाइट स्थिती मानली जात आहे. परिणामी पुन्हा प्रदूषण वाढीची भीती व्यक्त होत आहे.

प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पावलेल्या नागरिकांच्या एकूण संख्येपैकी १० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाल्याची आकडेवारी अलीकडेच समोर आली आहे. त्यामुळे हा प्रश्न किती गंभीर होत चालला आहे, हे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशातील सर्वाधिक प्रदू्षित शहरांच्या यादीत चंद्रपूरचा पहिल्या पाचमध्ये समावेश होता. त्यानंतर क्रमवारीत घसरण झाली. वाढते प्रदूषण लक्षात घेता केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने १३ जानेवारी २०१०पासून चंद्रपूर, बल्लारपूर, ताडाली व घुग्घुस या भागात उद्योगांना मॉनिटोरीयम लागू केले होते.परिणामी सर्वंकष प्रदूषण निर्देशांकात घसरण झाली. उद्योगबंदीने हे प्रदूषण कमी झाले आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. पण, आता मागील काही दिवसांत चंद्रपुरात धुलिकण व धुरात मोठी वाढ झाली आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

नागपूर ‘टॉप’वरून पाचवर

डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात नागपूर हे प्रदूषणात राज्यात ‘टॉप’वर असल्याचे दिसून आले होते. हिवाळी अधिवेशनकाळातच हे दिसून आल्याने संतापही व्यक्त झाला होता. चंद्रपूर खालोखाल असल्याने काहींनी समाधानही व्यक्त केले होते. पण, अवघ्या काही दिवसातच बदल होऊन चंद्रपूर राज्यात सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे.

१५ उद्योगांना कारणे दाखवा

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर प्रादेशिक विभागाने चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील १५ उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील दोन उद्योगांना प्रस्तावित आदेश दिले आहेत. घातक घनकचरा नियमावली २०१६अंतर्गत संमतीपत्राप्रमाणे मापदंडात ही तफावत आढळली आहे. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर प्रादेशिक विभागाने १५ उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राष्ट्रीय हरित लवाद क्रमांक ४७अंतर्गत नागभीड येथील रामदेव ऑइल रिफायनिंग व घुग्घुस येथील स्नेहा ऑइल रिफायनिंग या दोन उद्योगांना प्रस्तावित आदेश दिले आहेत. अलीकडेच अंबुजा सिमेंट व मल्टी ऑर्ग्यानिक्स या दोन कंपन्यांची पाच लाखांची बँक हमी जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
शहर वायू गुणवत्ता निर्देशांक

चंद्रपूर २५४

औरंगाबाद २३६

मुंबई १९९

नाशिक १९५

नागपूर १६१

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *