facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / बनावट नोटांमागचा सूत्रधार कोण?

बनावट नोटांमागचा सूत्रधार कोण?

आवाज न्यूज नेटवर्क – 

नाशिक – बनावट नोटा छापून त्या वितरित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष छबू नागरे, तसेच महापालिकेचा ठेकेदार व राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित रामराव पाटील-चौधरी आणि सिन्नर बाजार समितीचा माजी सभापती रमेश पांगारकर या तिघांचा समावेश असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे चलनातून बाद ठरवलेल्या हजार व पाचशेच्या नोटांची छपाई करण्यात आली असून, संशयित हे काम बऱ्याच दिवसांपासून करीत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, यामागचा सूत्रधार कोण, नोटांची छपाई कुठे होत होती, याचा पोलिस शोध घेत आहेत.

याबाबत माहिती देताना शहर पोलिसांनी मोठी सावधानता बाळगली आहे. हे प्रकरण बरेच मोठे असून, या गुन्ह्यात संशयितांची संख्या वाढणार असल्याची शक्यता पोलिसांना आहे. बनावट नोटांचे कारस्थान उघड करण्यासाठी पोलिसांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट, अशी भूमिका स्वीकारली आहे. लवकरच आणखी मोठा धमाका होण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

संशयित आरोपींकडून हजार व पाचशेच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. शहर, तसेच जिल्ह्यातील ही सर्वांत मोठी कारवाई असून, संशयित आरोपींनी बनावट नोटा देऊन बऱ्याच जणांना गंडा घातल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नवनवीन क्लृप्त्या काढून काळा पैसा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. कमिशन देऊन जुन्या नोटा बदलणे हा ट्रेंड सर्वत्र दिसून येतो. नाशिकमध्ये यापूर्वीच चार एजंटांना अटक करीत पोलिसांनी ३० लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. यात दोन हजार रुपये दराच्या नोटांचा समावेश होता. आडगाव पोलिसांनी अटक केलेल्या ११ संशयितांकडे मात्र हजार आणि पाचशे रुपये दराच्या जवळपास एक कोटी ३५ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या. कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून देणाऱ्या जिल्ह्यातील एजंटांना रात्रीच्या अंधारात बनावट नोटा द्यायच्या आणि त्यांच्याकडून दोन हजार रुपये दराच्या नव्या नोटा घ्यायचा, असा डाव संशयितांनी आखला होता. परगावाहून आलेल्या किती एजंटांना या प्रकारे गंडा घालण्यात आला, याचा तपास पोलिस करीत आहेत. बनावट नोटांचा सुळसुळाट वाढल्यानंतर इन्कम टॅक्स विभाग मात्र सतर्क झाला. त्यांना बनावट नोटांचा स्रोत समजल्यानंतर प्राप्तिकर विभागाच्या पुणे येथील युनिट एकने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

नोटांची हुबेहूब नक्कल!

शहर पोलिसांनी जप्त केलेल्या हजार आणि पाचशेच्या बनावट नोटा अगदी खऱ्या वाटाव्यात अशा आहेत. यातील बहुतांश नोटांचे सीरिअल क्रमांक एकच असून, नोटांची सफाईदार पद्धतीने छपाई करण्यात आली आहे. घाईत असताना किंवा अंधारात या नोटा खऱ्या की खोट्या हे समजणार नाही. याचाच फायदा घेत संशयित बनावट नोटा खपवत होते. या नोटा कुठे आणि कशा छापल्या, यामागील मुख्य सूत्रधार कोण? पुणे आणि मुंबईच्या संशयितांचे नाशिक कनेक्शन काय, असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे आले असून, त्याचा तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

मीठ पिशव्यांखाली दडवल्या नोटा

मध्यरात्रीच्या सुमारास आडगाव परिसरातील जत्रा हॉटेल चौफुलीनजीक पोलिसांनी एमएच १५/सीएम ७००२, एमएच ०४/ईएफ ९७०१ आणि एमएच १५/एफएच २१११ या तीन संशयास्पद कारचालकांना अडवले. पोलिसांनी या वाहनांची झडती घेतली असता त्यात मिठाच्या पिशव्यांची पॅकिंग असलेले बॉक्स आढळून आले. मात्र, पोलिसांची माहिती पक्की असल्याने त्यांनी मिठाचे बॉक्स उघडून पाहिले असता खाली बनावट नोटा आढळल्या. पोलिसांनी या तिन्ही कार जप्त केल्या आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *