facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / माजी सभापती, शहराध्यक्ष, ठेकेदार आणि बरेच काही

माजी सभापती, शहराध्यक्ष, ठेकेदार आणि बरेच काही

आवाज न्यूज नेटवर्क – 

नाशिक – बनावट नोटा छापून त्याद्वारे आपले उखळ पांढरे करून घेण्याचा गोरखधंदा पोलिस आणि इन्कम टॅक्स विभागाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. या गुन्ह्यात सिन्नर कृषी उत्त्पन्न बाजार समितीचा माजी सभापती रमेश पांगारकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष छबू नागरे आणि ठेकेदार म्हणून प्रदीर्घ चर्चेत असलेला रामराव पाटील यांचा समावेश सर्वांना धक्कादायक तितकाच संतापजनक ठरला आहे.

रामराव पाटलांवर यापूर्वी बरेच गुन्हे दाखल असून, शहरातील घंटागाडी योजनेचा बोजवारा उडवून देण्यात या महाशयाचा मोठा वाटा ठरला होता. अनेक बालंट अंगावर आल्याने पाटलांनी नाशिक सोडून पनवेलकडे आपला मोर्चा वळवला. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे कधी काळी निकटवर्तीय असलेले आणि सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती रमेश पांगारकर त्यांच्या सोबतीला आल्याने पनवेल, शहापूर परिसरात या दोघांनी जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहराध्यक्षाची भूमिका पार पाडल्यानंतर निवांत असलेल्या छबू नागरेला बनावट नोटांप्रकरणी अटक व्हावी, यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शोकांतिका काय असू शकते? माजी सभापती व माजी शहराध्यक्ष राजकीय दृष्टिकोनातून सध्या बाजूला पडलेले होते. व्यावसायिक कामानिमित्त मुंबईवाऱ्या करणाऱ्या या तिघांचा मुंबईतील संशयित आरोपीशी संबंध आला. नोव्हेंबरमध्ये झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून पुढे आलेल्या बनावट नोटांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आणि हे कारस्थान रचले गेले.

प्रकरणाचे मूळ दुबईत?

राजकीय पक्षाआड घेतलेला सामाजिक कार्याचा बुरखा या निमित्ताने उघड झाला असून, बनावट नोटांचे पाळेमुळे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या बनावट नोटांच्या प्रकरणाचे मूळ दुबईत दडले असल्याचे बोलले जाते आहे. काही दिवसांपासून संशयित आरोपींनी अनेकदा दुबईवाऱ्या केल्या असून, त्यांचे पासपोर्ट तपासण्याची मागणी पोलिसांना केली जात आहे. बनावट नोटा छापून वितरित करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास किमान १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. नाशिकमध्ये प्रथमच असा प्रकार घडला असून, यामुळे सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.

विजय पांगारकर वेगळे

काही दिवसांपूर्वी शहर पोलिस आणि इन्कम टॅक्स विभागाने संयुक्त कारवाई करीत छावा संघटनेचे पदाधिकारी विजय पांगारकर यांच्यासह महंत सुधीरदास पुजारी आणि नितीन लुंकड या व्यापाऱ्यास ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे सापडलेल्या नवीन चलनी नोटांचे विवरण देण्याचे आदेश इन्कम टॅक्स विभागाने दिले होते. विजय पांगारकर आणि शहर पोलिसांनी अटक केलेला रमेश पांगारकर हे एकाच गावातील असून, या योगायोगातील तथ्य पोलिस पडताळून पाहणार काय, याची उत्सुकता सर्वांना आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *