facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / सरकारी कार्यालयांचे होणार फायर ऑडिट

सरकारी कार्यालयांचे होणार फायर ऑडिट

आवाज न्यूज नेटवर्क – 

नाशिक – जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच शॉर्ट सर्किटची घटना घडल्याने सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने सर्व सरकारी कार्यालयांना फायर ऑडिट करून घेण्याचे आदेश काढले आहेत. इतकेच नव्हे, तर आगीसारखी दुर्घटना घडलीच तर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आगप्रतिबंधक उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षणही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या दालनात बुधवारी दुपारी अचानक धूर निघू लागल्याने कर्मचाऱ्यांसह उपस्थित यंत्रणेची धांदल उडाली होती. आगीसारखी घटना नियंत्रणात आणणारे फायर एक्स्टिंग्युशरसारखे मशीन उपलब्ध असूनही ते कसे चालवावे, याचे शास्त्रशुद्ध ज्ञानच यंत्रणेला नसल्याचे या घटनेमुळे उघडकीस आले. जिल्ह्यात कुठेही आपत्ती उद््भवली की तत्काळ मदत मिळेल या विश्वासाने संकटग्रस्त नागरिक जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधतात. मात्र, हीच आपत्ती या विभागाचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ओढवली, तेव्हा प्रशासकीय यंत्रणेची उडालेली धांदल महसूल यंत्रणेच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. आपत्ती व्यवस्थापनाच्या सज्जतेचा बुरखाही फाडला गेला. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बुधवारी निघालेला धूर हा ट्यूबचा इलेक्ट्र‌िक चोक पंक्चर झाल्यामुळे निघाला, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्र‌िक विभागाने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. पाच वर्षे जुना झालेला हा चोक बदलण्यात आल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

या घटनेची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांनी त्यांच्या इमारतींचे फायर ऑडिट करवून घ्यावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी गुरुवारी दिली. या आदेशाचे पत्र तयार केले असून, ते सर्व सरकारी कार्यालयांना पाठविणार असल्याची माहिती खेडकर यांनी दिली. सरकारी कार्यालयांमध्ये आगप्रतिबंधक उपाययोजना करा, त्या पूर्वीपासूनच असतील तर त्या सुस्थितीत आहेत की नाही, याची तपासणी करून घ्या, सरकारी कार्यालयांमधील वायरिंग जुने झाले असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे वायरिंगची दुरुस्तीदेखील करून घ्या, असे या आदेशात म्हटले आहे. सर्व कार्यालयांना फायर ऑडिट सक्तीचे असून २०१२ चा तसा कायदाच आहे. मंत्रालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर फायर ऑडिटबाबत सरकारी कार्यालयांकडून सतर्कता दाखविली जाते. सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फायर एक्स्टिंग्युशरसारखी आगविरोधी साधने चालविता यायला हवीत. हे मशीन कुणाला चालविता येत नसेल तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रशिक्षण देईल, अशी ग्वाही प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *