facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / पुणे / कवीला हवी जाणकारांची दाद

कवीला हवी जाणकारांची दाद

सध्याच्या काळातील कवी गुळगुळीत शब्दांच्या आधारे तसेच शब्दछल करून कविता रचतात आणि वाहवा मिळवतात. मात्र हजारो सामान्य रसिकांची दाद मिळवण्यापेक्षा एका जाणकार रसिकाची दाद मिळाली तरी कवी उजळतो, असे सांगत ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी सध्याच्या कवींचा समाचार घेतला.
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान तर्फे आयोजित साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी त्यांनी वास्तववादी कवितेचा वेध घेतला. गोड गुलाबी, दिसायला देखणी तरुणी, आणि तिच्या भोवती गुंफल्या जाणाऱ्या कवितेपेक्षा वास्तवाचा आधार घेऊन समाजातील स्त्रियांची खरी परिस्थिती कथन करणाऱ्या आणि समाजाचे स्वरूप कथन करणाऱ्या कविताच साहित्याचा विकास घडवू शकतात असे त्यांनी सांगितले. कलावंमत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. ता. भोसले, महापौर प्रशांत जगताप, स्वागताध्यक्ष दिलीप बराटे, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, मुरली लाहोटी आदी उपस्थित होते. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रंथ महोत्सवाचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
‘कोणत्या प्रकारचे साहित्य श्रेष्ठ, असा प्रश्न सध्या जाणवू लागला आहे. काही साहित्यिक नुसती पाने भरतात आणि कादंबऱ्या लिहितात मात्र त्यांच्या साहित्याचा दर्जा किती चांगला असतो, हा एक चिकित्सेचा भाग आहे. वाङ्मयीन संस्कृतीचा विकास होणे गरजेचे असेल, तर मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती करण्यापेक्षा श्रेष्ठ साहित्याची निर्मिती करणे गरजेचे आहे. प्रत्येक लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्याच्या साहित्यातून जगाची अनुभूती येते. साहित्यिकाचे व्यक्तिमत्त्व जर उन्नत, वैचारिक पातळीवर विचार करणारे, जनसामान्यांना कळवळा असणारे असेल, तर त्यांची अनुभूती विशाल परिणामांची असते. त्यामुळे साहित्यिकांना जीवनदृष्टीचा साक्षात्कार व्हायला हवा,’ असे मत डॉ. काळे यांनी व्यक्त केले.
द. ता. भोसले म्हणाले, ‘समाजात शेतकरी हा लोकसंस्कृतीचा अधारस्तंभ आहे, तर साहित्यिक मानवी संस्कृतीचा अलंकार आहे. समाजाच्या शाश्वत आणि सर्वस्पर्शी विकासासाठी वकील, डॉक्टर, राजकारणी, धर्मकारणी, इंजिनिअर यांच्यापेक्षाही शेतकरी आणि साहित्यिकांचे योगदान मोठे राहील.’ ‘सध्याच्या युगात माणसाचे आयुष्य विरघळल्यासारखे झाले आहे. त्या आयुष्याला नवी उभारी देण्यासाठी चांगल्या साहित्याच्या वाचनाची गरज आहे. घटकाभर मनोरंजन करणारे साहित्य वाचण्यापेक्षा समाजातील वास्तवतेचा पडदा उलगडणारे साहित्य अधिक वाचले जाणे गरजेचे आहे, याकडे भोसले यांनी लक्ष वेधले.’ वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनात चर्चासत्रे, कवी संमेलने, परिसंवाद आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम होणार आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *