facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / काळ्या पैशाविरुद्धची लढाई थांबणार नाही

काळ्या पैशाविरुद्धची लढाई थांबणार नाही

‘गेली ७० वर्षे ज्यांनी मलई खाल्ली, ज्यांनी देशाला ठगवले, त्याच लोकांची काळ्या पैशांविरोधातील सरकारची लढाई कशी अपयशी ठरेल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. मात्र, सव्वाशे कोटी जनतेचा हा देश त्यांच्यापुढे झुकणार नाही. आता अनेक जण जाळ्यात अडकत आहेत. ५० दिवसानंतर ईमानदार लोकांचा त्रास कमी होऊन बेईमान लोकांचा त्रास वाढणार आहे. काळ्या पैशांचा नायनाट होईपर्यंत ही लढाई थांबणार नाही’, अशी अधिक आक्रमक भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हजारोंच्या जनसमुदायापुढे मांडली.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुल येथे एमयूटीपी ३ व ४, शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू आणि मेट्रो आणि रेल्वेच्या पायाभूत प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‌शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्र तसेच राज्यातले मंत्री उपस्थित होते.

पंतप्रधानांनी भाषणाची सुरुवात, ‘छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा’, अशी मराठीत केली तेव्हा ‘मोदी…मोदी…’ अशा जोरदार घोषणा श्रोत्यांमधून सुरू झाल्या. ‘२०१४च्या लोकसभा ‌निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली तेव्हा सर्वप्रथम मी रायगडावरील छत्रपतींच्या समाधीवर जाऊन नतमस्तक झालो. वीर, पराक्रमी, सुप्रशासक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या छत्रपती शिवरायांचे जीवन हे संघर्षमय होते. त्यांचे जीवन जगाला प्रेरणा देणारे आहे. श्रीराम, श्रीकृष्ण, महात्मा गांधी या महापुरुषांकडे अनेक पैलू होते, तेही आपल्या जीवनाला प्रेरित करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे पाणी नियोजन, आरमार, मुद्रानीती आदी धोरणे आपल्याला सुराज्य कसे असायला हवे, हे शिकवितात. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालखंडात चलन हे स्वराज्यातच बनविले, यावरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते’, असे पंतप्रधान म्हणाले.

गिरगाव चौपाटीवरील कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री प्रवीण पोटे, राज्यमंत्री रणजित पाटील, खा. रावसाहेब दानवे, आ. मंगल प्रभात लोढा, राज पुरोहित, स्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक, संभाजी भिडे उपस्थित होते.

मुंबईसाठी प्रकल्पांचा विक्रम

‘७० वर्षांनंतरही देशातल्या समस्या सुटण्याऐवजी अधिकच जटील बनल्या आहेत. विकास हाच या समस्या सोडविण्याचा मार्ग आहे. गरीबांना स्वस्त औषधे कशी मिळतील, गरीब आ‌णि मध्यमवर्गीयांना दिलासा कसा मिळेल, यासाठी आमचे अथक प्रयत्न सुरू आहेत. आम्ही पाच कोटी गरीबांना गॅसचे कनेक्शन देत आहोत. १८ हजार गावे अंधारात होती. त्या गावांमध्ये वीज देत आहोत. देश बदलत आहे, प्रगती करत आहे. जगात ताठ मानेने उभा राहात आहे’, असे मोदी म्हणाले. मुंबईसाठी एकाच कार्यक्रमात एक लाख ६ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले जात आहेत, असे यापूर्वी कधी घडले आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला.

नगरपालिका निवडणुकीत यश

‘८ नोव्हेंबरला मी काळ्या पैशाविरोधात लढाई सुरू केली. देशवासियांना त्रासही झाला. पण माझी साथ जनतेने सोडली नाही. महाराष्ट्रात झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला जनतेने यश दिले. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयावर जनतेने मोहोरच उमटवली आहे’, या शब्दांत पंतप्रधानांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची पाठ थोपटली. पंतप्रधानांनी फडणवीस यांचे खास कौतुक केले. ‘फडणवीस सरकार चांगले काम करत आहे. त्याबद्दल फडणवीस आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन’, असे पंतप्रधान म्हणाले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *