facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / पुणे / कोंढवा परिसरात बिबट्याचा थरार

कोंढवा परिसरात बिबट्याचा थरार

गजबजलेल्या कोंढवा परिसरातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट’च्या (एनआयबीएम) आवारात शनिवारी बिबट्याचा थरार अनुभवयास मिळाला. ‘एनआयबीएम’च्या इमारतीत बेसिनखाली बिबट्या दिसल्यानंतर सुरुवातीला धास्तावलेल्या महिलेने आणि नंतर अन्य कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून इमारतीचे दरवाजे बंद केले. पोलिस, वन विभाग आणि रेस्क्यू टीम यांना माहिती दिली. पाच तासांच्या थरारनाट्यानंतर बिबट्याला सुरक्षित पकडण्यात यश आले आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.

या बिबट्याला कात्रज येथील वन्यप्राणी अनाथालयात नंतर नेण्यात आले. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सायंकाळी पुण्यापासून दूर असलेल्या वनक्षेत्रात सोडण्यात आल्याची माहिती उप वनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी दिली.

शनिवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान ऑफिसची स्वच्छता करीत असताना एनआयबीएमच्या कर्मचारी स्वाती कुंजीर यांना पँट्रीच्या बेसिनखाली बिबट्या बसलेला दिसला. त्या घाबरल्या आणि ऑफिसच्या बाहेर पळत येऊन त्यांनी मदतीसाठी हाका मारल्या. त्यानंतर सूर्यकांत दळवी आणि राजू सूर्यवंशी या कर्मचाऱ्यांनी ऑफिसचा दरवाजा कुलूप लावून बंद केला. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वन विभाग अधिकारी आणि कात्रज प्राणी संग्रहालयाच्या रेस्क्यू विभागाची टीम काही वेळातच संस्थेत दाखल झाली.

सुरुवातीला दोन तास बिबट्या बंद ऑफिसमध्ये फिरत होता. इमारतीच्या प्रकाशन विभागात जाऊन तो कॉर्नर टेबल खाली अर्धा तास बसला. तिथून उठून शेजारील डीटीपी रूम मध्ये जाऊन त्याने तळ ठोकला. बिबट्या स्थिरावलेला पाहिल्यावर रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. रेस्क्यू टीम, वन कर्मचारी आणि डॉक्टरांनी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू केले. मात्र, चपळ असलेला बिबट्या वेळोवेळी त्यांना गुंगारा देत होता. दोन ते तीन वेळा त्याने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या दिशेने धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते खिडकीच्या बाहेर असल्याने बिबट्याचा पंजा काचेवर आदळला. सहा वेळा प्रयत्न करूनही बिबट्यावर नेम बसेना. दुपारी साडेबाराच्या दरम्यान तो कपाटाच्या आड काही वेळ लपून बसला होता. तो खिडकीच्या समोर यावा म्हणून टेबलवर कापडही टाकण्यात आले. मात्र, तो आतून गुरगुरत राहिला. अखेर दुपारी एकच्या दरम्यान त्याला इंजेक्शन देण्यात यश आले. पाच तासांच्या थरारानंतर बेशुद्ध बिबट्याला पिंजऱ्यात बंद केले.

बघ्यांची गर्दी कुंपणाबाहेर

बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा नको म्हणून वन अधिकाऱ्यांनी नागरिकांना संस्थेच्या प्रवेशद्वाराबाहेरच अडवले होते. संस्थेतील हॉस्टेलमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना ऑफिसपासून दूर अंतरावर उभे केले होते. आपल्याला बिबट्याचा एक तरी फोटो मिळावा, म्हणून मोबाइलमधील कॅमेरे ऑन करून बसलेल्या नागरिकांची धडपड सुरू होती. एवढ्या वस्तीत बिबट्या खरेच आलाय, का, असे प्रश्नही वारंवार विचारले जात होते.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *