facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / मेट्रो प्रकल्प मार्गी

मेट्रो प्रकल्प मार्गी

‘पुणे मेट्रो प्रकल्पाला उशीर झाल्याने नागरिकांमधील नाराजी स्वाभाविक आहे. या प्रकल्पाचे काम वेळेत झाले असते, तर तो कमी खर्चात झाला असता. तरीही, देर आएँ, दुरुस्त आएँ’, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ केला. ‘आधीच्या सरकारला अनेक कामे अर्धवट ठेवायची सवय होती. कामे पूर्ण करण्याची संधी मला मिळत आहे,’ असे सांगून त्यांनी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारवर टीकाही केली.

‘पुणेकर नागरिकांना वाहतुकीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मेट्रो यापूर्वीच झाली असती, तर अनेकांनी स्वतःचे वाहन खरेदी करण्याऐवजी मेट्रोचा पर्याय स्वीकारला असता,’ असे निरीक्षण मोदी यांनी नोंदविले. पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा काढताना, त्यांनी थेट ‘महापौर, आज तर तुम्ही खूप खूश असाल ना,’ असा खोचक टोमणाही लगावला.

मोदी म्हणाले, ‘देशात शहरांचे नियोजन आणि विकास करताना केवळ त्या वेळचा विचार करण्यात आला. त्यामुळे रस्ते-पाणी, वीज अशा पायाभूत सुविधांचे जाळे तुकड्या-तुकड्यांमध्ये निर्माण झाले. अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने त्यांचा खर्च वाढला, शहराच्या समस्येत भर पडली आणि त्याचवेळी हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही आवश्यक लोकसंख्येला अपुरे पडू लागले. शहरांच्या विकासाचे हे जुने मॉडेल हद्दपार करून पुढील २५-३० वर्षांचा विचार आत्ताच करण्याची गरज आहे. त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत,’ असे मोदी यांनी सांगितले.

शहरांसोबत ग्रामीण भागांचा कायापालट करण्यासाठीही तब्बल अडीच लाख ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडले जात आहे. रस्ते-रेल्वे-विमानतळ अशा सुविधांप्रमाणेच माहिती-तंत्रज्ञानाच्या सुविधाही गावा-गावांत उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आधुनिक भारताचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.

पिंपरी-चिंचवडला पुन्हा संधी

‘स्मार्ट सिटी’साठी निवडण्यात आलेल्या राज्यातील दहा शहरांमधून पिंपरी-चिंचवडला वगळण्यात आले होते. त्याला पुन्हा संधी देण्यात यावी, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मान्य केली. पिंपरी-चिंचवडला स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.

शिवाजीनगर-हिंजवडीचे भूमिपूजन एप्रिलमध्ये

शहरातील पहिल्या टप्प्यातील दोन मार्गिकांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत असतानाच, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘शिवाजीनगर ते हिंजवडी’ या तिसऱ्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन एप्रिलमध्ये करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *