facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / रस्ते रखडण्याची वर्षपूर्ती

रस्ते रखडण्याची वर्षपूर्ती

शहराची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या जालना रोड आणि बीड बायपास रस्त्याच्या कामाचे भूमिपजून होऊन रविवारी (२५ डिसेंबर) एक वर्ष पूर्ण होईल. मात्र, या काळात दोन्ही कामाच्या डीपीआरचे (सविस्तर प्रकल्प अहवाल) घोडे प्रशाकीय पातळीवर अडल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत.
केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गतवर्षी २५ डिसेंबर रोजी औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ही कामे केली जातील, असे त्यावेळी जाहीर करण्यात आले. या रस्त्यांमध्ये नगरनाका ते केंब्रिज शाळा या जालना रस्त्याचा व बीड बायपास रस्त्याच्या समावेश करण्यात आला. या दोन्ही रस्त्यांसाठी सुमारे साडेसातशे कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा गडकरींनी केली. या रस्त्यांची कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याची मागणी आमदार अतुल सावे यांनी केली होती. आता या घटनेला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळात दोन्हीही रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. जालना रोड व बीड बायपास रस्ता हे दोन्हीही रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचे नियोजन साडेसातशे कोटी रुपयांच्या खर्चात केले जाणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली. रस्त्याचे काम करण्यासाठी बीड बायपासवर काहीच अडचण नाही. रस्त्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध आहे. भूसंपादन करण्याची गरज नाही, असेही जाहीर करण्यात आले होते. जालना रोडसाठी मात्र भूसंपादन करणे गरजेचे होते. महापालिकेने विशेष मोहीम राबवून १२० फूट रुंद रस्ता मोकळा करून दिला. त्यामुळे या रस्त्याच्या कामातील अडथळा देखील दूर झाला, पण डीपीआर व टेंडरच्या प्रक्रियेत अडकलेल्या या दोन्ही रस्त्यांची कामे तुंबली आहेत.

नागरिकांचे हाल
राज्य शासनाने शहरातील पाच रस्त्यांच्या कामासाठी पालिकेला २४ कोटी ३३ लाख रुपये दिले होते, या निधीतून ज्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे करण्यात येणार होती, त्यात महावीर चौक ते क्रांतीचौक या रस्त्याचा समावेश होता. हा रस्ता जालना रोडचाच एक भाग आहे. संपूर्ण जालना रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या ताब्यात आल्यामुळे महापालिकेने महावीर चौक ते क्रांतीचौक या रस्त्याचे काम करण्यास नकार दिला. महापालिकेनेही रस्त्याचे काम केले नाही व भूमिपूजनाच्या नंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देखील अद्याप काम सुरू केले नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

जालना रोड व बीड बायपास रस्त्याच्या कामाचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार झाला आहे. पुढील महिन्यात या दोन्हीही रस्त्यांच्या कामाचे टेंडर होईल आणि त्यानंतर लगेचच दोन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. मी या दोन्हीही रस्त्यांच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सतत पाठपुरावा करीत आहे. प्रशासकीय कामाला वेळ लागतो. – अतुल सावे, आमदार

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *