facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / ‘राष्ट्रवादी’त आमदार चव्हाणांविरोधात सूर

‘राष्ट्रवादी’त आमदार चव्हाणांविरोधात सूर

‘आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यशैलीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत होत आहे. पक्षात कोणी मोठे होऊ नये असा प्रयत्न ते सातत्याने करत आले आहेत,’ यासह विविध आरोपांच्या फैरी झाडत राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी शनिवारी तोफ डागली.

राष्ट्रवादी भवनात एका पत्रकार परिषदेत पक्षाचे उपाध्यक्ष कदीर मौलाना, माजी आमदार संजय वाघचौरे, प्रदेश चिटणीस प्रा. माणिक शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य उदयसिंग राजपूत यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. कदीर मौलाना म्हणाले, ‘नगरपालिका निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळू शकले नाही. याला माजी मंत्री सुरेश धस यांना कसे जबाबदार धरता येईल? औरंगाबाद महापालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ १३ वरून तीनवर आले. याला सतीश चव्हाण हेच जबाबदार आहेत. निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना मदत करण्याऐवजी विरोधकांना रसद पुरवण्याचे काम ते नेहमी करत आले. आमदार चव्हाण व आमदार अब्दुल सत्तार यांच्यात पक्की मैत्री असून, ‘मॅच फिक्सिंग’सारखे ते निवडणुकीचा निकाल ठरवतात. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मला पाडण्याचे राजकारण करण्यात आले. संजय वाघचौरे यांना पैठण विधानसभा निवडणुकीतही पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘मॅच फिक्सिंग’चा धंदा बंद होण्याची गरज आहे. त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच सुरेश धस यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना कोणाचेही वर्चस्व सहन होत नाही. पक्षाशी त्यांचे काहीही देणे-घेणे नाही. ते सर्वेसर्वा असल्याचे आभास निर्माण करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण असते. पक्षापेक्षा कोणी मोठे नाही,’ अशा शब्दांत कदीर मौलाना यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

माजी आमदार संजय वाघचौरे म्हणाले, ‘औरंगाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, लातूरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कोणीही मोठा होऊ नये, असा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो. कंत्राटदार, दलालांपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. निवडणुकीत हार-जीत होत असते. त्यांनी त्यांच्या नेतृत्त्वाखाली एखादे पॅनल निवडून तरी कधी आणले आहे का? पक्षातील वरिष्ठांना चुकीची माहिती देणारी ‘कानपूर लाइन’ बंद होण्याची आवश्यकता आहे. पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी व्यापक संधी मिळणे आवश्यक झाले आहे.’या प्रसंगी उपाध्यक्ष नीलेश राऊत, अभिषेक देशमुख, राहुल तायडे, विजय साळवे, संजीव शेळके, लता पाटील, शमा परवीन आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

‘धनशक्तीचे राजकारण’
माजी आमदार संजय वाघचौरे म्हणाले, ‘आमदार चव्हाण हे पूर्वी कंत्राटदार म्हणून काम करीत होते. धनशक्तीच्या जोरावर ते राजकारण करू पाहात आहेत. पक्षात अन्य कोणी मोठा होऊ नये असे ते पाहातात. त्यांच्या कार्यपद्धतीची शेवटची घटका आलेली आहे. आठही जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या कार्यापद्धतीमुळे त्रस्त आहेत. धनशक्तीच्या बळावर राजकारण असेच सुरू राहिले तर पक्ष रसातळाला जाईल.’

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *