facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / नागपूर / रेल्वे हॉकर भारतीय क्रिकेट संघात

रेल्वे हॉकर भारतीय क्रिकेट संघात

जन्मतः अंध, घरच्या परिस्थितीमुळे दहावीपुढचे शिक्षणही नाही. त्यामुळे नोकरीचा प्रश्नच नव्हता. रेल्वेमध्ये हॉकर म्हणून तो कटलेट विकू लागला, मिळेल त्यावर भागवू लागला. अचानक एका मित्राच्या आग्रहाखातर त्याने दृष्टिहिनांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये भाग घेतला, आणि त्याची आयुष्याची चाके फिरू झाली. नाशिक येथील अनीस बेग या क्रिकेटपटूची दृष्टिहिनांच्या ‘टी ट्वेन्टी’ विश्वचषकाकरिता भारतीय संघात निवड झाली आहे. बेग त्याच्या भारतीय संघातील निवडीबद्दल म्हणतो, ‘अब तक रेल्वे मे कटलेट बेच के गुजारा किया. अब लगता है की जिंदगी की पटरी लाइन पे लग रही है.’

मि. इंडिया फाउंडेशन, ​अनिल कपूर फॅन्स क्लब, नागपूर आणि नरेंद्रनगर दुर्गा उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शुभदा वैद्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच अनिल कपूर यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय दृष्टिहीन मुलांचे क्रिकेट सामने आंतरराष्ट्रीय ​क्रिकेटपटू ‘विदर्भ गौरव’ प्रशांत वैद्य चषक, अनिल कपूर प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ते २६ डिसेंबरपर्यंत नरेंद्रनगर, नासुप्र मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शेष महाराष्ट्र या चमूकडून अनीस बेग खेळत आहे. बेग हा मूळ नाशिकचा असून त्याची घरातील परिस्थिती अत्यंत साधारण आहे. त्याचे वडील ट्रकचालक असून, आई गृहिणी आहे. मोठा भाऊसुद्धा ट्रकचालक आहे. जन्मतः दृष्टिहीन असलेल्या अनीसची शाळा दहावीनंतर सुटली. छोटी-मोठी कामे करून तो आपल्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला. रेल्वेमध्ये हॉकर म्हणून तो कटलेट विकू लागला. आज टी-ट्वेन्टीमध्ये राष्ट्रीयस्तरावर अनेक शतकी खेळी खेळणाऱ्या आणि उत्तम गोलंदाज असलेल्या बेगची भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

बेग म्हणाला, ‘मला लहानपणापासून क्रिकेटचे वेड होतेच. घरी रेडिओवर मी कॉमेंट्री ऐकायचो, शाळेत खेळायचोसुद्धा. परंतु, २००० सालानंतर घरच्या परिस्थितीमुळे मी शिक्षण सोडले आणि कमवायला लागतो. त्यानंतर मी बॅट हातातच घेतली नाही. २०१२ला मी मुंबईला एके ठिकाणी बसलो होतो तेव्हा मला बॉल आणि घुंगरांचा आवाज आला. मी सहज तेथे गेलो तेव्हा माझी ओळख शेष महाराष्ट्राचा कर्णधार प्रशांत जगताप यांच्यासोबत झाली. त्यांना माझा खेळ फारच आवडला. त्यांच्या आग्रहाखातर मी खेळू लागलो. या महिन्यातच आमचे केरळ येथे शिबिर झाले. या शिबिरात माझी टीट्वेन्टी विश्वचषकाकरिता भारतीय संघात निवड झाली. २१ तारखेला याबाबत घोषणा झाली. यंदा हा विश्वचषक भारतातच होणार आहे.’

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *