facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / एसटीचा कामगार करार लांबला

एसटीचा कामगार करार लांबला

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – एसटी महामंडळातील कामगारांच्या पगारवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा कामगार करार आणखी लांबणीवर पडला आहे. कराराची मुदत संपून आठ महिने उलटले तरीदेखील नव्या कराराची कार्यवाही प्रशासनाने सुरू केलेली नाही. त्यातच कामगारांच्या पगाराचा आढावा घेण्यासाठी नियुक्त समितीस आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याने अडचणी वाढल्या आहेत. या प्रकारामुळे कामगारांमध्ये मात्र संतापाची भावना निर्माण झाली असून संघटनाही संपाच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.

महामंडळातील कामगारांच्या पगाराचा आढावा घेण्यात येऊन दर चार वर्षांनी करार केला जातो. या कराराद्वारे पगारात वाढ केली जाते. करार वेळेवर करण्यात मात्र नेहमीच उशीर केला जातो. कराराची मुदत संपल्यानंतर पुढे वर्षभरदेखील करार होत नाही. दीड ते दोन वर्षांनंतर करार होऊन पगारवाढ झाली तरी ती अत्यंत कमी असते. तसेच पगारवाढीच्या फरकाचे पैसेही एकदम दिले जात नसल्याने या करारावर कामगार वर्ग कायमच नाराज असतो. यंदाच्या वर्षातही मागील प्रकाराचीच पुनरावृत्ती पाहण्यास मिळत आहे. कराराची मुदत ३१ मार्च २०१६ मध्येच संपली आहे. तरीदेखील नवीन करार झालेला नाही. कामगारांच्या पगाराचा आढावा घेण्यासाठी महामंडळाने वेतनसुधार समिती सहा महिन्यांपूर्वीच स्थापन केली आहे. या समितीने अद्याप अहवाल महामंडळाला दिलेला नाही. महामंडळाने मात्र फेब्रुवारी २०१७ पर्यंत समितीस मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे करार होण्याची शक्यता आणखी दोन ते तीन महिने लांबणीवर पडली आहे. महामंडळाकडून सुरू असलेल्या या चालढकलीमुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. करार तर होत नाहीच शिवाय इतर महत्त्वाच्या मागण्यांकडेही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने आंदोलन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या परिस्थितीत संघटनाही मागे राहिलेल्या नाहीत. नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. बैठकांत आंदोलनाबाबत चर्चा होत असून तयारी केली जात आहे.

कामगारांबाबत उलटा न्याय

कामगारांच्या पगारवाढीचा मुद्दा उपस्थित झाल्यावर एसटी तोट्यात असल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे केले जाते. परंतु, बसस्थानकांवर सौरविजेचा निर्णय असो की बसस्थानकांचे सुशोभीकरण असो या कोट्यवधी रुपये खर्चाचे निर्णय मात्र झटपट घेतले जात आहेत. प्रवाशांच्या सेवेला नेहमीच प्राधान्य दिले जात असले तरी कामगारांबाबत मात्र उलटा न्याय लावला जात असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *