facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / नाशिक / केबीसीप्रकरणी आरोपपत्र दाखल

केबीसीप्रकरणी आरोपपत्र दाखल

गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून राज्यातील शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या केबीसीचे संचालक व एजंटांविरोधात तपास पथकाने न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या कोर्टात २८९ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दहाही संशयितांविरोधात महाराष्ट्र ठेवीदार व गुंतवणूकदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल असून, त्यांनी २१२ कोटी १८ लाख ३९ हजार ९८० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

केबीसीचा संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण, आरती भाऊसाहेब चव्हाण यांनी केबीसी मल्टिट्रेड कंपनीची स्थापना करून गुंतवणूकदारांना तिप्पट व्याजाचे आमिष दाखविले. चव्हाणचे नातेवाईक, तसेच चव्हाणसाठी काम करणाऱ्या एजंटांनी गुंतवणूकदारांना जादा पैशांचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतली. सुरुवातीचे काही महिने हा व्यवहार जोरात सुरू होता. कालांतराने गुंतवणूकदारांना परतावा मिळणे बंद झाले. गुंतवणूकदार त्रस्त झाल्याने ११ जुलै २०१४ रोजी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या दरम्यान भाऊसाहेब व आरती चव्हाण सिंगापूरला फरार झाले. पोलिसांनी कंपनीचे इतर संचालक बापूसाहेब छबू चव्हाण, पंकज राजाराम शिंदे, नितीन पोपटराव शिंदे, संजय वामनराव जगताप, नानासाहेब छबू चव्हाण, साधना बापू चव्हाण, भारती मंडलिक शिलेदार, कौशल्या संजय जगताप यांना अटक करून त्यांची मालमत्ता जप्त केली. दरम्यान, पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे कंपनीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब व आरती चव्हाण परत येण्यास तयार झाले. मे २०१६ मध्ये चव्हाण दाम्पत्यास आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई विमानतळावरून अटक केली होती. केबीसी संचालकांविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून, त्या संदर्भात या दोघांची चौकशी करण्यात आली. सद्यःस्थितीत ते कारागृहात आहेत, तर आरती चव्हाणने प्रकृतीच्या कारणास्तव जामिनासाठी अर्ज केला असून, यावर जानेवारीमध्ये सुनावणी होणार आहे.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *