facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / पुणे / मंगेश तेंडुलकर बनले सांताक्लॉज

मंगेश तेंडुलकर बनले सांताक्लॉज

एरव्ही आपल्या कुंचल्याच्या फटकारांमधून मोठ्या मोठ्या राजकारण्यांच्या तोंडचे पाणी पळवणारे एक पांढऱ्या दाढीतले व्यंगचित्रकार अचानक सांताक्लॉज होऊन आले आणि त्यांनी क्षणात चिमुकल्यांच्या मनात घर केले. पाहता पाहता त्यांनी सर्वांना चॉकलेट्स देऊन नाताळच्या शुभेच्छा दिल्या. मुलांसोबत ‘जिंगल बेल’ या गाण्यावर ठेका धरला. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे हे रूप मनाला मोहवून टाकणारे होते.

नाताळ सणाच्या निमित्ताने मैत्र युवा फाउंडेशनच्यावतीने जीवधारा शाळेतील विशेष मुलांसाठी ख्रिसमस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अचानक सांताच्या वेशात तेंडुलकर आले आणि त्यांना पाहून निरागस मुलांनी एकच जल्लोष केला. आपल्या लाडक्या सांताकडून चॉकलेट, आवडत्या वस्तू घेण्यासाठी मुलांमध्ये धडपड झाली. तेंडुलकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांना हवे ते चॉकलेट देऊन त्यांना आपलेसे केले. ख्रिसमस ट्री, बेल, फुग्यांनी सजवलेले सभागृहही त्या वेळी आनंदाने झुलत होते.

मैत्र युवा फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, जीवन धारा मतीमंद शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता शिंदे, यश पंडित आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात तेंडुलकर यांच्या हस्ते विशेष मुलांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

‘निसर्ग प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देत असतो. निर्सगाची भाषा समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने जे मिळेल ते काम केले पाहिजे. चांगल्या कामासाठी कौतुकाची गरज नसते. एक महत्त्वाचे चांगले काम आपोआप आपले मार्ग शोधते. निरपेक्षपणे काम करणारी माणसे समाजात खूप कमी आहेत. अशा माणसांची समाजाला खरी गरज आहे,’ असे मत मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत देशपांडे यांनी केले. मुलांना विविध खेळणी, खाऊ, कपड्याचे वाटप या वेळी मैत्र युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.

कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता माणसाने काम करत राहिले पाहिजे. माझ्या छोट्याशा प्रयत्नांनी या चिमुकल्यांच्या डोळ्यात आनंद दिसणार असेल, तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. निरपेक्ष भावनेने हे सगळे केले पाहिजे. – मंगेश तेंडुलकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *