facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / पुणे / शिवरायांचे अप्रकाशित पत्र सापडले

शिवरायांचे अप्रकाशित पत्र सापडले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय आणि राजकीय धोरणांवर प्रकाश टाकणारे आणि ‘स्वराज्य’ या राजांच्या संकल्पनेत सामावलेला सामान्य माणसाचा विचार अधोरेखित करणारे खुद्द शिवछत्रपतींचेच अस्सल आणि अप्रकाशित पत्र उजेडात आले आहे. शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. केदार फाळके यांना धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात हे पत्र मिळाले असून, इतिहास अभ्यासकांसाठी हा अनमोल ठेवा ठरणार आहे.

फाळके यांनी शिवछत्रपतींच्या कार्यावर पीएचडी मिळवली आहे. रामचंद्रपंत अमात्य लिखित आज्ञापत्रावर ते अभ्यास करत आहेत. या अभ्यासासाठी धुळे येथील दफ्तरखान्यात शोध घेत असताना त्यांना हे अस्सल मुद्राधारी पत्र मिळाले आहे. १८ ऑगस्ट १६७३ म्हणजेच राज्याभिषेकापूर्वी वर्षभर सातारातर्फेचे सुभेदार अबाजी मोरदेव यांना हे पत्र शिवरायांनी पाठवले आहे. पाली (जि. सातारा) येथील पाटीलकी वतनासंबंधात कान्होजी खराडे आणि काळभर यांच्यातील वादावर दिलेला निवाडा या पत्रातून समोर आला आहे. विशेष म्हणजे, जेधे शकावलीनुसार सातारा हे २७ जुलै १६७३ मध्ये स्वराज्यात दाखल झाले. त्यानंतर पुढच्याच महिन्यातले (१८ ऑगस्ट) हे पत्र असल्याने स्वराज्यात दाखल झालेल्या प्रदेशाची प्रशासकीय व्यवस्था लावण्याबाबत महाराज किती दक्ष होते, हे यातून दिसून येत आहे. पत्राबाबत बोलताना डॉ. फाळके म्हणाले, ‘हे पत्र राज्याभिषेकापूर्वीचे आहे. पाटीलकी वतनासंबंधात खराडे आणि काळभर यांच्यात वाद सुरू होता. ही बाब छत्रपतींच्या कानी गेल्यावर त्यांनी सातारा तर्फेचे सुभेदार अबाजी मोरदेव यांना हे पत्र पाठवले आहे. खराडे यांना समज द्यावी तसेच त्यांची घोडी किंवा माणसे पालीमध्ये असतील तर त्यांना बाहेर घालवावे आणि गावातल्या पिकांची लावणी, संचणीची कामे काळभरांकडून करून घ्यावीत असा आदेश राजांनी मोरदेव यांना दिले आहे.’

या पत्रावर दोन ओळींनंतर ‘श्री शिवनरपती हर्षनिदान, महादेव मतिमत प्रधान’ असा प्रधानाचा शिक्का असून पत्राच्या शेवटी ‘मर्यादेयं विराजते’ ही छत्रपतींची मोर्तब मुद्रा आहे. पत्रातले हस्ताक्षर हे भारत इतिहास संशोधक मंडळात असणाऱ्या महाराजांच्या १७ जुलै १६७३ या दिवशी दिलेल्या अस्सल कौलनाम्यातल्या हस्ताक्षरासारखे आहे. पत्राच्या शेवटी ‘परवानगी हुजूर’ ही अक्षरे अन्य व्यक्तीच्या हातची आहेत. पत्राच्या मागे ‘सुरू सुद’ असा पत्रनोंदणीचा तत्कालीन शेरा असून, त्याखाली पैवस्तीची म्हणजेच पत्र पोहोचल्याची तारीख अरबी कालगणनेत दिली आहे. जी ८ सप्टेंबर १६७३ या इंग्रजी तारखेशी जुळते. महाराजांची आजवर सुमारे २७० पत्रे मिळाली आहेत. या पत्रातले अक्षराचे वळण, भाषाशैली, वाक्यरचना, शब्द हे महाराजांच्या अन्य पत्रांसारखेच आहेत, अशी माहिती डॉ. फाळके यांनी दिली.

रयतेचे राजे आणि प्रशासकीय व्यवस्था

या पत्रात असणाऱ्या वादाचा निकाल पाली येथे महाराजांच्या उपस्थितीत १ फेब्रुवारी १६७६ मध्ये झाला. त्यापूर्वी तीन वर्षे हा वाद सुरू असल्याचे या पत्रामुळे समोर आले आहे. न्यायाच्या बाजूने ठामपणे उभे राहणारे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे या पत्रातून समोर येतात. सातारा स्वराज्यात आल्यावर केवळ २४ दिवसांतले हे पत्र आहे. दक्ष प्रशासकीय कारभाराचा हा दाखला आहे. या पत्रावर आणखी अभ्यास सुरू असून, त्यासाठी डॉ. वि. आ. चितळे, शरद कुबेर, प्रा. डोंगरे आणि रमण चितळे यांनी सहकार्य केल्याचे डॉ. केदार फाळके यांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *