facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / नागपूर / संतांचा पुन्हा ‘दस’चा नारा

संतांचा पुन्हा ‘दस’चा नारा

हिंदूंनी अपत्यांची संख्या वाढविण्याचा मुद्दा वारंवार वादग्रस्त ठरला असताना नागपुरात पुन्हा एकदा या मुद्दा आक्रमकपणे मांडण्यात आला. देशभरात हिंदूची संख्या कमी होत असताना केवळ ‘हम दो, हमारे दो’पर्यंत मर्यादित न राहता आता ‘हम दो, हमारे दस’चा अंगीकार हिंदू समाजांनी करावा, असे आवाहन विविध संत-महंतांनी रविवारी नागपुरात केले. रेशीमबाग परिसरात आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभाच्या समारोपात हिंदूंच्या कमी होत जाणाऱ्या लोकसंख्येवर मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली. विविध धर्मपीठांच्या प्रमुखांसह विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनीदेखील आक्रमकपणे हा मुद्दा लावून धरला.

एकीकडे विशिष्ट समाजाची लोकसंख्या वाढत असताना देशातील बहुसंख्यक समाजाला मात्र कुटुंबकल्याण करण्यास सांगितले जाते. देशात हिंदूंची संख्या कमी होत असून पुढील काळात ते अल्पसंख्यक होण्याची शक्यता आहे. हिंदू कमी झाल्याने देशविरोधी शक्तींनाच बळकटी मिळते. हे टाळण्यासाठी हिंदूंची लोकसंख्या वाढणे गरजेचे आहे. आता हिंदूंनी ‘हम दो, हमारे दस’चा अंगीकार करावा, असे आवाहन शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी केले.

हिंदू समाज राहणार नाही तर हिंदुत्वाची आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात येणे अशक्य आहे. अधिक संख्येने मुले झाली तर त्यांचे पालनपोषण करणे कठीण जाते, अशी भीती दाखविली जाते. मात्र, जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या जगण्याची व्यवस्था परमेश्वराने केली आहे. त्यामुळे, हिंदूंनी आपली लोकसंख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

देशभरात सुरू हिंदूंचे पलायन

तोगडिया यांनीदेखील आपल्या संपूर्ण भाषणात हाच सूर कायम ठेवला होता. केवळ काश्मीर खोऱ्यातून हिंदूंना निर्वासित व्हावे लागले आहे, असे नाही. मेरठ, मुरादाबाद, मुर्शिदाबाद, केरळ अशा कित्येक ठिकाणी हिंदूंना आपली ठिकाणे सोडून पलायन करावे लागत आहे. हिंदू अल्पसंख्यक झाले की धर्मविरोधी शासन प्रबळ होते आणि मग हिंदूंचा नरसंहार सुरू होतो. येत्या १०० वर्षांमध्ये हिंदू अल्पसंख्यक होणार आहे. लोकसंख्येबाबतचे धोरण शासनाने जाहीर करावे, अशी मागणी विहिंपचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली. भारतात वास्तव्यास असलेल्या ३ कोटी बांगलादेशींना का परत पाठवले जात नाही, असा सवालही तोगडिया यांनी उपस्थित केला.

संत‘वचने’

■ श्रीकृष्णांना होती एक लाखापेक्षा जास्त अपत्ये, त्यांचे पालनपोषण कसे झाले?

■ एकच अपत्य असेल अन् त्याचे काही बरेवाईट झाले तर पिंडदान कसे करणार?

■ एक हात मे माला, दुसरे हात मे भाला

■ हिंदूंची संख्या नसेल तर सैनिक, विचारवंत, संत कुठून मिळणार?

■ बहुसंख्यकांना कुटुंबकल्याण, इतर समाजाची लोकसंख्या वाढ, कशामुळे आहे राजसत्ता अगतिक?

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *