facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / पुणे / जातिव्यवस्था हाणून पाडणारे लेखन हवे

जातिव्यवस्था हाणून पाडणारे लेखन हवे

‘लेखकाने समाजातील दांभिकतेवर प्रहार करून ठोस भूमिका मांडणे अपेक्षित आहे. देशीवादाची भूमिका बळावत असताना समाजाला दिशा देण्यासाठी अंतर्मुख, अस्वस्थ करणाऱ्या साहित्याची निर्मिती होण्याची गरज आहे. एकविसाव्या शतकातही होत असलेल्या जातिव्यवस्थेच्या समर्थनाची भूमिका हाणून पाडणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे,’ असे आग्रही मत प्रसिद्ध लेखक डॉ. मनोहर जाधव यांनी सोमवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान यांच्यातर्फे एस. एम. जोशी सभागृहात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष प्रकाश रोकडे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना ’प्रा. रा. ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार’, तर खडकी शिक्षण संस्थेला ’मूल्यसाधना पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. माजी अध्यक्ष डॉ. अश्विनी धोंगडे, स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, डॉ. विकास आबनावे, प्रकाश जवळकर, मंदाकिनी रोकडे, डॉ. भालचंद भागवत, शंकर आथरे, महेंद्र भारती, शिवाजी शिर्के, उद्धव कानडे उपस्थित होते. यावेळी ‘प्रकाशपर्व’ आणि ‘बौद्ध संस्कार विधी’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.

‘समाजातील जातिआधा​रित, धर्माधारित, आर्थिक स्तरावरील भेदाभेद पाहून मन उद्विग्न होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता समाजामध्ये रुजत नाही, जातीअंत होत नाही, तोवर भारत पूर्णतः विकास साधू शकणार नाही. गतकाळाविषयी चर्वितचर्वण करण्यापेक्षा बदलत्या काळाचा स्वीकार करीत, त्याला अनुसरून सामाजिक भान ठेवत लेखकांनी आपल्या भूमिका ठामपणे मांडायला हवी,’ यावर डॉ. जाधव यांनी बोट ठेवले.
रोकडे म्हणाले, ‘आज विशिष्ट धर्माच्या आधारावर राष्ट्राची संकल्पना मांडली जात असून, देशात पुरोगामी विचारांच्या लोकांची हत्या होत आहे, ही गंभीर बाब आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय दहशतवादामुळे सामान्य माणूस भयभीत झाला आहे. या परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल, तर साहित्यिक, विचारवंतांनी निर्भयपणे पुढाकार घेतला पाहिजे.’
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ‘विचाराच्या आधारे आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. सामान्यतः आपण परिवर्तनवादी असतो. मात्र, आपल्या जातीत किंवा धर्मात बंदिस्त राहतो. त्यामुळे आपल्या समतेच्या कक्षा रुंदावत ठेवल्या पाहिजेत.’

आपल्या हक्कांसाठी स्त्रिया पुढे येताहेत, आंदोलने करताहेत ही आनंदाची बाब आहे. परंतु, केवळ मंदिर, दर्ग्यात प्रवेश मिळवणे म्हणजे स्त्री-पुरुष समानता साधली असे नव्हे. महिलांनी आपल्यातील श्रेष्ठ-कनिष्ठ भेद बाजूला सारून परस्पर सामाजिक सुसंवाद वाढविला पाहिजे.
– डॉ. अश्विनी धोंगडे

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *