facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / जळगाव / ट्रान्सपोर्टनगरची जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली

ट्रान्सपोर्टनगरची जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली

जळगावातील मेहरुण ‌शिवारातील ट्रान्सपोर्टनगरची जागा महापलिका मालकीची असून, ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या जागेसंदर्भातील कराराची मुदत संपून आज २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण जागा ताब्यात नसल्याने महापालिकेला मोठ्या उत्पन्नाला मुकावे लागत आहे.

मेहरुण शिवारातील ट्रान्सपोर्टनगरची पावणेचार एकर जागा महापालिकेच्या मालकीची आहे. ही जागा सन १९८३ मध्ये नगरपालिकेच्या तत्कालीन प्रशासकांनी तीन वर्षांच्या मुदतीने ट्रान्सपोर्टनगरला दिली होती. ही मुदत सन १९८६ मध्ये संपली. मात्र, त्यानंतर या जागेबाबत प्रशासनाने काहीच कार्यवाही न केल्याने ही जागा आजही ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडे आहे. या जागेबद्दल महापालिकेला ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून केवळ ६० हजार रुपये प्रतिवर्ष भाडे मिळत आहे. या व्यवहारात महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. विद्यमान महापौर नितीन लढ्ढा यांनी डिसेंबर २०१३ मध्ये ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. लढ्ढा यांच्या सूचनेनंतर महापालिका प्रशासाने ट्रान्सपोर्ट असो‌सिएशनला नोटिसादेखील दिल्या होत्या.

या मार्केटमध्ये ११८ गाळे आहेत. करारनाम्याची मुदत १९८६ मध्ये संपली आहे. मनपा नरगरचना विभागाने महापालिका अधिनियम कलम ८१ ब अन्वये ट्रान्सपोर्ट असोसिएशनला नोटीस दिली होती. त्यावर ३ सप्टेंबर २०१४ ला सहाय्यक नरगरचनाकारांकडे सुनावणी झाली. त्यावेळी असोसिएशनच्या सदस्यांनी आयुक्त संजय कापडणीस व तत्कालीन स्थायी समितीचे सभापती नितीन लढ्ढा यांच्यासमोर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर नगररचनाकार यांनी या प्रकरणी कुठलाही निर्णय न घेता सुनावणी उरकून घेत आयुक्तांसमोर सुनावणीचे पत्र दिले होते. नगररचनाकार व तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे सुनावणी झाल्यानंतरदेखील जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू न झाल्याने महापौरांनी प्रशासनाला विचारणा केली होती. त्यानुसार आता पुन्हा कलम ८१ ब ची नोटीस देवून जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *