facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / नाशिक / शुल्कवाढप्रश्नी ‘तारीख’

शुल्कवाढप्रश्नी ‘तारीख’

पालक शिक्षक संघ कार्यकारिणी आणि शिक्षण खात्याला न जुमानता शहरातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी शिक्षण शुल्कामध्ये वारेमाप वाढ केली आहे. ती रद्द करण्यासह संबंधित शाळांच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी करणाऱ्या पालक-शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हरकतींवर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षण शुल्क नियमन समितीपुढे सोमवारी सुनावणी झाली. मात्र, संबंधित शाळांचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. या समितीने पुढील महिन्यात पुन्हा सुनावणी होईल, असे आदेश दिले.

शहरातील केंब्रीज, अशोका, सेंट फ्रान्सिस या इंग्रजी माध्यमांच्या बड्या शाळांच्या मनमानी कामकाजाबद्दल त्याच शाळांतील पालक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह काही पालकांनी शिक्षण खात्यासह कोर्टातही तक्रारी दाखल केल्या आहेत. या शाळा शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित पालक प्रतिनिधींनी विभागीय शिक्षण शुल्क नियमन समितीचे अध्यक्ष रमेश देशमुख यांच्यापुढे केला. यावेळी समितीचे सदस्य सनदी लेखापाल उल्हास बोरसे, निवृत्त शिक्षण सहसंचालक अरुण ठाकरे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते. या सुनावणीदरम्यान उपस्थित पालक व पालक प्रतिनिधींनी संबंधित शाळांनी केलेली शिक्षण शुल्क वाढ ही पालक शिक्षक संघ कार्यकारिणीच्या व शिक्षण खात्याच्या मंजुरीशिवाय केलेली आहे. त्यामुळे ती शुल्कवाढ बेकायदेशीर असल्याने रद्द करण्याची मागणी केली. याशिवाय यापैकी काही शाळांकडून विद्यार्थ्यांना मानसिक व शारिरीक छळही केला जात आहे. या प्रकाराचीही शहानिशा करून कारवाईची मागणी केली.

सुनावणीला राणेनगरच्या सेंट फ्रान्सिस शाळेच्या पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अॅड. सिमना अकील आयुब, तिडके कॉलनी शाखेचे मकरंद वाघ, हरीश वाघ, एलियास खान, अशोका स्कूलचे पालक-शिक्षक संघाचे अमोल कलंत्री, तृप्ती ठाकूर, केंब्रीज स्कूलचे पालक-शिक्षक संघाचे राजेश बडनखे, योगेश पालवे, शेखर कुलकर्णी यांच्यासह इतर पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

गैरहजेरीत निर्णय घेणे अनुचित
पालक व पालक प्रतिनिधींनी या समितीसमोर काही न्यायालयीन आदेशांचे कागदपत्रेही सादर केली. त्यानंतर या समितीने या पालकांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर येत्या जानेवारीमध्ये संबंधित शाळांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पुन्हा या विषयावर सुनावणी घेण्याचा अंतिम निर्णय या पालकांना दिला. या पालकांनी पुढील सुनावणीपेक्षा आताच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली. यावर संबंधित शाळांच्या वतीने या सुनावणीस कोणीही उपस्थित नसल्याने त्यांच्या गैरहजेरीत अंतिम निर्णय घेणे अनुचित ठरेल असे मत समितीने नोंदविले. मात्र, पुढील सुनावणीस संबंधित शाळांचे जबाबदार प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास समिती अंतिम निर्णय घेईल. हा निर्णय मात्र संबंधित शाळांना बंधनकारक राहील, असेही मत या समितीने यावेळी नोंदवले.

सेंट फ्रान्सिस स्कूलकडून शिक्षण खात्याचे नियम व आदेश धाब्यावर बसविले जात आहेत. या शाळेच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी यापूर्वी नेमलेल्या चौकशी समितींच्या अहवालातही या शाळेने नियमांचे उल्लंघन केल्याचे नमूद आहे. आजच्या सुनावणीस काहीतरी ठोस निर्णय होणे अपेक्षित होते.
– अॅड. सिमना अकील आयुब, उपाध्यक्ष, पालक-शिक्षक संघ

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *