facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / सांगली जिल्हा बँकेवर प्राप्तिकर खात्याचा छापा

सांगली जिल्हा बँकेवर प्राप्तिकर खात्याचा छापा

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयावर सोमवारी दुपारी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या सात जणांच्या पथकाने बँकेत प्रवेश करताच आत कोणालाही सोडायचे नाही, असे बजावत विश्रामबाग पोलिसांशी संपर्क साधून पोलिस बंदोबस्त मागवून घेतला.

नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी होत असल्याचे समोर येत असून, अधिकाऱ्यांनी महत्वांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. दुपारी पावणेदोन वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत पथक तेथेच तळ ठोकून बसल्याने बँकेची नाकेबंदीसारखी स्थिती झाली होती.

राज्यातील अन्य जिल्हा बँकांवर छापे पडत असल्याचे समोर येत असतानाच सोमवारी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दुपारी दीड वाजता बँकेत दाखल झाले. तिसऱ्या मजल्यावर पोहचलेल्या पथकाने पुढील पाच मिनिटांत कार्यालयाचा ताबा घेतला. लिफ्ट बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तिसऱ्या मजल्यावर कोणाला येऊ देऊ नका, असे बजावताना प्राप्तिकरचे दोन अधिकारी स्वतः बाहेर थांबले. त्यांच्यासोबत बंदुकधारी सुरक्षारक्षक होते. अन्य अधिकाऱ्यांनी विविध विभागांचा ताबा घेऊन कागदपत्रांची, संगणकावरील नोंदींची तपासणी सुरू केली. सांगली रोड शाखेचा (पहिला मजला) दरवाजाही बंद करण्यात आला. पथकाने काही महत्वाच्या नोंदी ताब्यात घेतल्याचे समजते.

केंद्र सरकारने नोटबंदी जाहीर केल्यानंतर पुढील चार दिवसांत सांगलीच्या जिल्हा बँकेत ३१७ कोटींच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जमा झाल्या. नंतर नोटा जमा करून घेण्यास बंदी घालण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या धोरणाविरुद्ध राज्यभर या बँकांनी आवाज उठवला. मोर्चेही काढले. तरीही धोरणात बदल झाला नाही. उलट बँकांमागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. पाचशे, हजार रुपयांच्या नोटांच्या रुपाने जमा झालेल्या रक्कमा नेमक्या कुणाच्या याची चौकशी गतीने सुरू झाली.

नाबार्डने यापूर्वी बँकेच्या सहा शाखा आणि नंतर सात शाखांची तपासणी केली. त्यात काही आढळले नसल्याचे बँकेने जाहीर केले. मात्र, ३१७ कोटी आले कुठून या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्राप्तिकर विभागाचा प्रयत्न आहे. पहिल्यांदा दोन लाखांहून अधिक रक्कम जमा करणाऱ्यांची नावे कळवा, अशी नोटीस जिल्हा बँकेला काढण्यात आली होती. दोन लाखांवर रक्कम जमा करणारे व्यक्तिगत खातेदार नाहीत, असे बँकेने सांगितले, मात्र संस्थांच्या ठेवी चर्चेत आल्या. विशेषतः पतसंस्थांच्या ठेवी मोठ्या संख्येने असल्याचे समोर आले. त्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये नेमक्या त्याचाच शोध सुरू असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तिसऱ्या मजल्यावरच कारभार

जिल्हा बँकेच्या तिसऱ्या मजल्यावर सध्या प्रभारी व्यवस्थापकीय संचालक, व्यवस्थापक, कृषी विभाग, इतर कर्ज विभाग, प्रशासन विभागाचे कक्ष आहेत. ते यापूर्वी दुसऱ्या मजल्यावर होते. नूतनीकरणाच्या प्रक्रियेत अधिकाऱ्यांचे कक्ष वगळता अन्य विभाग कायमस्वरुपी तिसऱ्या मजल्यावर स्थलांतरित झाले. याच ठिकाणी कागदपत्रे, संगणकीय माहिती उपलब्ध असल्याने तेथेच तपासणी करण्यात आली.

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *