facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / एटीएममधील पैसा होणार मोठा

एटीएममधील पैसा होणार मोठा

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – कॅलिब्रेट झालेले कोणतेही एटीएम केंद्र बंद न ठेवण्याच्या आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा फक्त ‘एटीएम’मधूनच देण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने बँकांना दिल्याने शहरातील कार्यरत एटीएमची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बँकांमधील रांगा कमी करण्यासाठी आणि बँकांच्या शाखांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

रिझर्व्ह बँकेतर्फे रोकड वितरण करतानाच याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. बहुतांश बँकांना प्रामुख्याने पाचशेच्या नोटांचे वितरण करण्यात आले आहे. या नोटा बँकेतील काउंटरवर न देता एटीएममध्येच टाकण्यात याव्यात, असेही या आदेशात म्हटले आहे. कॅलिब्रेट झालेले कोणतेही एटीएम बंद ठेवू नये. त्यात पुरेशी रक्कम असेल, याची खबरदारी घ्यावी; तसेच प्रामुख्याने पाचशे व शंभर रुपयांच्या नोटांचा यामध्ये भरणा असावा, अशा रिझर्व्ह बँकेच्या सूचना असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘रिझर्व्ह बँकेकडून आम्हाला पाचशे रुपयांच्या नव्या नोटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एटीएममधून पैसे काढणे खातेदारांसाठीही सोयीचे ठरेल,’ असे कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी सांगितले. एटीएममधून पैसे दिल्यास सर्व खातेदारांना समप्रमाणात पैसे मिळतील, असा रिझर्व्ह बँकेचा हेतू असल्याचे एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या सरव्यवस्थापकांनी सांगितले.

‘गेल्या आठवड्यापर्यंत रोख रकमेच्या अभावी शहरातील १० ते २० टक्क्यांच्या आसपासच एटीएम सुरू होती. स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्वाधिक एटीएम सुरू होती. आता मात्र, २५ ते ४० टक्क्यांदरम्यान एटीएम सुरू झाली आहेत. बँकांना मिळणाऱ्या रोख रकमेचा मोठा हिस्सा एटीएममध्येच टाकायचा असल्याने लवकरच कार्यरत एटीएमची संख्या वाढेल,’ अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या एटीएममधून प्रत्येक खातेदाराला प्रत्येक एटीएम कार्डावर चोवीस तासांत २५०० रुपये काढता येतात. रोकडटंचाई अजूनही कायम असल्याने एटीएमद्वारे रक्कम काढण्यावरील मर्यादा कायम राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *