facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / राज्याचे राजकारण दांभिकपणाने नासले

राज्याचे राजकारण दांभिकपणाने नासले

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – ‘जातीपातीचे राजकारण इतरांनी केले तर पाप किंवा जातीयता असते, पण आपण केले तर ते मात्र पुण्य किंवा समाजकारण असते. या ढोंगी व दांभिकपणामुळेच महाराष्टाचे राजकारण व समाजकारण नासले. नासलेले जातकारण सुधारण्यासाठी सर्व जाती-पाती एकसंध कराव्या लागतील. या कामासाठी सरकारला जातवार जनगणना करून प्रत्येक जातीला तिच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तिचा वाटा द्यावा लागेल,’ असे परखड मत मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केले. मराठवाडा साहित्य संमेलनात ते बोलत होते.
सोयगाव येथील ३८ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा उदघाटन सोहळा मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या रोखठोक भाषणाने गाजला. सामाजिक सुधारणातील दांभिकपणावर त्यांनी टीका केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती अंताचे स्वप्न पाहिले. त्यांच्यापूर्वी हेच स्वप्न महात्मा फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी साहू महाराज आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पाहिले. बहुजन समाजातील या धुरिणांकडे दूरदृष्टी होती आणि त्यांनी त्या दृष्टिने आचरणही केले होते, पण जात हा भारतीय समाजाला त्वचेसारखा चिकटलेला असाध्य रोग आहे. स्वार्थांधतेच्या आजच्या काळात ती मोडणे अशक्य आहे. कारण जात ही वाईट, ती मोडली पाहिजे असे म्हणणारेच जात टिकवून ठेवण्यासाठी सर्वाधिक जबाबदार आहेत. जातीचा अंत झाला पाहिजे असे म्हणणारेच सर्वात आधी दुसऱ्याच्या जातीचा शोध घेत असतात. ही जातीअंताच्या स्वप्नाची वेदना आहे. त्यामुळे कुणी काहीही म्हणत असले, तरी जातीअंत होणे नजीकच्या काळात तरी दुर्लभ दिसते. हे सत्य स्वीकारूनच सामाजिक समतोलासाठी आरक्षणाचा व सवलतींचा व्यापक पायावर, सर्वसमावेसक विचार केला पाहिजे. जास्त वास्तवाला सामोरे जाण्याचा हाच एक मार्ग आहे. राजसत्तेला हे जमणार नाही. जातीजातीच्या ह्या गुंत्याची विविध स्तरातून आलेल्या अभ्यासकांनी व लेखक-कवींनी वस्तुनिष्ठ व तर्कनिष्ठ अभ्यास करून दुभंग समाजाला एकसंध होण्यासाठी मार्ग मिळेल असे लेखन केले पाहिजे. या प्रकारच्या वैचारिक साहित्याची मोठी गरज आहे. मनोरंजनपर साहित्यामुळे समाजाची दोन घटका करमणूक होईल, पण आज मनोरंजनपर, करमणूकप्रधान साहित्यापेक्षा वैचारिक व समाजाला अंतर्मुख करायला लावणाऱ्या साहित्याची मोठी गरज आहे,’ असे ठाले पाटील म्हणाले. —

कणाहीन मुले
‘व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. स्मार्ट सिटी करण्यावर सरकारचा भर आहे, पण उद्धवस्त होणारे ग्रामजीवन सरकारला दिसत नाही. हे सर्व पाहून सरकार शेतकऱ्यांचा द्वेष करते की काय असा सवाल निर्माण होतो. जगाला पोसणारा आज मरणपंथाला लागला आहे. कृषीप्रधान कुटुंबातून सत्तेत गेलेली शेतकऱ्यांची मुले सत्तेच्या चतकोरभर तुकड्यासाठी कणाहीन बनून सरकारी धोरणांना पाठिंबा देत आहेत. चार-दोन अपवाद वगळता कणा नसलेले आमदार-खासदार काही करतील याची अपेक्षा करता येत नाही,’ असे ठाले पाटील म्हणाले

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *