facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / लेखकांनी सरंजामी मानसिकता सोडावी

लेखकांनी सरंजामी मानसिकता सोडावी

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – ‘मराठवाड्याचे भीषण वास्तव मराठवाड्यातील लेखकांसमोर उभे आहे. परावलंबी व सरंजामदारी मानसिकतेतून लेखक बाहेर पडले, तरच ते वास्तवाला भिडू शकतील. वास्तवाकडे ग्रामीण लेखक रोमँटिक दृष्टिकोनातून पाहू शकणार नाहीत. तसेच स्वांतसुखाय बनूनही चालणार नाही. हे वास्तव बदलण्याचे आव्हान लेखकांना स्वीकारावेच लागेल,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि ३८ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
अजिंठा शिक्षण संस्थेच्या वतीने सोयगाव येथे दोन दिवस ३८ वे मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे मंगळवारी स्वातंत्र्यसेनानी बाबूरावजी काळे साहित्यनगरीत उदघाटन करण्यात आले. यावेळी नटवर्य लोटू पाटील व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी शिक्षणमंत्री राजेंद्र शिंगणे, स्वागताध्यक्ष रंगनाथ काळे, प्रकाश काळे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, सचिव डॉ. भास्कर बडे, द्वारकादास पाथ्रीकर, शेषराव मोहिते, नगराध्यक्ष कैलास काळे, प्राचार्य भगवानराव देशमुख, गणेश अग्निहोत्री व संजय गरूड यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाध्यक्ष डॉ. वाघमारे यांनी मराठवाड्याचा साहित्यिक आढावा घेत काही संकल्पना मांडल्या. ‘सोयगावला स्वतःचा चेहरा आणि व्यक्तिमत्व आहे. या भागातील शिल्पकला अतिशय प्रसिद्ध आहे. शिल्प म्हणजे गोठलेले काव्य असते. फक्त ती वाचण्यासाठी सौंदर्यासक्त मनाची गरज असते. असे मन असलेले हजारो लोक जगभरातून अजिंठा व वेरूळ लेणी पाहण्यासाठी येतात. मराठवाड्याचा हा पहिला ठेवा आहे, तर संत साहित्य हा दुसरा ठेवा आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, जनाबाई यांनी संत साहित्यातून वैचारिक योगदान दिले. त्या काळी महिलेने काव्य लिहिणे आश्चर्यकारक होते. त्यामुळे जनाबाईंच्या नावाने एखादे अध्यासन केंद्र सुरू करण्याची गरज आहे. महिलासांठी ते साहित्य प्रेरणादायी ठरेल. मराठी साहित्यात मराठवाड्याचे योगदान काय, असे कुणी विचारतात. सातशे वर्षे गुलामीत राहूनही मराठी भाषा टिकवली हेच मराठवाड्याचे योगदान आहे. कोणताही भाग सांस्कृतिक पोकळीत जगत नसतो. अगदी आदिवासीसुद्धा आपली गीते आणि नृत्य बसवतात. या पोकळीतून मराठवाड्यात लोकसाहित्याची चळवळ रुजली. चांगले शिक्षण ही या भागाची गरज होती. ग्रामीण साहित्य म्हणजे शिवारभर पसरलेले दुःख आहे. दलित साहित्यात चांगली कादंबरी आली नाही. तसे ग्रामीण साहित्यात चांगले आत्मकथन आले नाही. शिवाय संपूर्ण गावगाडा ग्रामीण साहित्यात कधीच आला नाही याची खंत वाटते. वर्तमानकाळानुसार लिहिणे, भूतकाळात रमणे किंवा भविष्याचा वेध घेणे या लेखकाच्या तीन भूमिका असतात. बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी पुढे घेणारेच लेखन आवश्यक आहे,’ असे वाघमारे म्हणाले.

सध्या मराठवाड्याचे नाव ‘दुष्काळवाडा’ पडले आहे. पाण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या परिस्थितीत लेखकांनी आपल्या जाणिवा विकसित करणे आवश्यक आहे.
– डॉ. जनार्दन वाघमारे, अध्यक्ष, ३८ वे मराठवाडा साहित्य संमेलन

 अंबाजोगाईत मराठी विद्यापीठ स्थापन करा
‘मराठी विद्यापीठाची गरज – मुलांना मराठी भाषेत प्राथमिक शिक्षण मिळत नसेल, तर भाषेचे भवितव्य कठीण आहे. अध्ययन आणि अध्यापन या दोन पातळीवर भाषिक काम करण्याची गरज आहे. भाषाशास्त्र, लेखनशास्त्र आणि उच्चारशास्त्र यावर आधारित शिक्षणाची गरज आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याची गरज आहे. हिंदी आणि तेलुगू विद्यापीठ असेल, तर मराठी विद्यापीठ का नको,’ असा सवाल संमेलनाध्यक्ष डॉ. जनार्दन वाघमारे यांनी भाषणात केला. ‘भाषा मेली की साहित्य मरते आणि साहित्य मेले की संस्कृती मरते,’ असे ते म्हणाले.

महानोर यांना जीवन गौरव
साहित्य संमेलनात ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. तसेच संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेचे संपादन ज्योती स्वामी, रमेश औताडे, दिलीप बिरुटे, निर्मला बोराडे यांनी केले आहे. यानंतर शिल्प, उर्मी या साहित्य अंकांचेही प्रकाशन करण्यात आले.

रंगकर्मींचा सत्कार
नटवर्य लोटू पाटील यांनी सोयगाव येथे १९०५ मध्ये नाट्यगृह उभारून नाट्यसेवा केली. त्यांच्यासोबत काम केलेल्या निवडक रंगकर्मीचा संमेलनात सत्कार करण्यात आला. यात सोनाजी बारी, सोपानमामा बोर्डे, अमृतमामा चौधरी, प्रभाकर मापारी, दगडू सोनार यांचा सत्कार करण्यात आला. तर शैक्षणिक कामगिरीसाठी रवीराज काळे आणि स्वप्नील चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी जुन्या कलाकारांना भावना आवरता आल्या नाहीत. लोटू पाटील यांच्यावरील माहितीपट दाखवून जुन्या परंपरेला उजाळा देण्यात आला.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *