facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / काँग्रेस विरोधी बाकावर

काँग्रेस विरोधी बाकावर

इचलकरंजी नगरपरिषदेतील सत्तेच्या राजकारणाला सुरुवात होण्यापूर्वीच अनपेक्षित अशी कलाटणी मिळाली आहे. राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केल्याने राष्ट्रीय काँग्रेसवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादीच्या अशोकराव जांभळे गटाला सत्तेत सहभाग देताना पहिल्यावर्षी बांधकाम आणि पाणी पुरवठा ही दोन मलईदार खाती देण्यात आली असून उपनगराध्यक्षपदाची संधी ताराराणी आघाडीला मिळाली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना सत्तेपासून दूर ठेवत पुरेसे संख्याबळ नसतानाही नगरपरिषदेची चावी आपल्या हाती राखण्यात आमदार सुरेश हाळवणकर यांना यश आले आहे.

नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपद भाजपला मिळाले असले तरी सत्तेची सूत्रे मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी-राजर्षि शाहू विकास आघाडीच्या हाती गेली होती. सध्या नगरपरिषदेत काँग्रेस १८, भाजप १६ (१ अपक्ष, १ शिवसेना), ताराराणी आघाडी ११, राजर्षि शाहू विकास आघाडी १० (१ अपक्ष) आणि राष्ट्रवादी ७ अशी सदस्य संख्या आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने विकासकामांचा निधी आणण्यासाठी नगरपरिषदेची सत्ताही भाजपकडे असणे गरजेचे होते. आमदार सुरेश हाळवणकर यांनी सत्तेसाठी कोणत्याही पक्षात फूट फाडण्याचा प्रयत्न केला जाणार नाही असे सांगतानाच विकासकामांसाठी जे सोबत येतील त्यांचा उचित सन्मान केला जाईल असे सांगितले होते. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांत भाजपची सत्ता येईल असे खळबळजनक वक्तव्य करुन फोडाफोडीच्या राजकारणावर भर दिला होता. त्यानुसार इचलकरंजीतही भाजपसोबत राजर्षि शाहू विकास आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न झाला. तसा प्रस्तावही आघाडीचे प्रमुख मदन कारंडे यांना देण्यात आला होता. मात्र कारंडे गटाने स्पष्टपणे नकार दर्शविल्याने अखेरीस राष्ट्रवादीच्या जांभळे गटाला आपलेसे करण्यात भाजपला यश मिळाले.

माजी आमदार अशोकराव जांभळे हे भाजपसोबत चर्चा करीत असल्याने काँग्रेस व शाहू आघाडीची घालमेल वाढली होती. माजी मंत्री प्रकाश आवाडे, मदन कारंडे यांनी जांभळे यांच्याशी संपर्क साधत भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या वृत्ताची खातरजमा करुन घेण्याचा प्रयत्न केला. पण जांभळे यांनी आपण एकत्रित असून कधीही फारकत घेणार नसल्याचे सांगितल्याने काँग्रेस व शाहू आघाडी निश्चिंत झाली होती. मात्र मंगळवार व बुधवार या दोन दिवसात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे राष्ट्रवादीने भाजपशी जवळीक साधली आहे. नगरपरिषदेच्या राजकारणात जांभळे गटाला सन्मान देत भाजपने दोन महत्वाच्या समित्या त्यांना बहाल केल्या आहेत. या घडामोडी दरम्यान भाजपचा मित्रपक्ष असलेल्या ताराराणी आघाडीला स्विकृत सदस्यापासून वंचित रहावे लागले. माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके यांना दिली जाणारी संधी जांभळे गटाच्या रविंद्र माने यांना मिळाली आहे. ताराराणी आघाडीला उपनगराध्यक्ष व एका समिती दिली जाणार आहे. तर आघाडीपासून जांभळे गटाने फारकत घेतल्याने काँग्रेसमया हाता-तोंडाशी आलेला घासही हिरावला गेला आहे.

दरम्यान, राजर्षि शाहू विकास आघाडीच्या सदस्यांनी मदन कारंडे यांची भेट घेऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपशी मिळतेजुळते घेण्याचा सूर आळवण्यास सुरुवात केली होती. मात्र कारंडे यांनी काँग्रेसमया सोबत राहण्याचा निर्णय घेऊन चर्चेला पूर्णविराम दिला.

चौकट

वादच कारणीभूत

सत्तेची सूत्रे हाती येऊनही काँग्रेस आघाडीत फुट पडण्यास जांभळे-कारंडे गटातील पक्षांतर्गत वाद कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार तथा रविंद्र माने यांच्या आई इंदुमती माने यांचा पराभव करुन कारंडे गटाने माने यांना नगरपरिषदेपासून दूर ठेवण्याची खेळी यशस्वी झाली. पण जांभळे गटाने भाजपशी हातमिळवणी करुन ताराराणी आघाडीकडून स्विकृत सदस्य म्हणून रविंद्र माने यांना पुन्हा सभागृहात आणत कारंडे गटावर कुरघोडी केली आहे.

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *