facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / होरपळून दोन कामगार ठार

होरपळून दोन कामगार ठार

आवाज नेव्ज नेटवर्क  –

अहमदनगर – एमआयडीसीतील सनफार्मा या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये लिफ्टसाठी खड्डा खोदण्याचे काम सुरू असताना ब्रेकरमुळे स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन कामगार भाजून जागीच ठार झाले. दोन कामगार गंभीर जखमी झाले असून, त्याच्यांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

ब्रेकरमुळे ठिणगी उडून कंपनीच्या आवारातील हवेत असलेल्या स्फटिक रसायनांनी पेट घेतल्याने हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यात काशिनाथ दादाभाऊ साळवे (वय ४०, नागापूर) व सुभाष आल्हाट (वय ४०, खडांबे, राहुरी) या दोघांचा भाजल्याने मृत्यू झाला. तर आबासी गंधर्व बेहरा (वय ४०, रा. हस्तापूर, ओरिसा) व बद्रीनाथकुमार मोहन मिर्धा (वय ३५, रा. रामगड, झारखंड) हे दोघे गंभीर भाजले असून, त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
नागापूर एमआयडीसीमध्ये नगर-मनमाड महामार्गावर नागापूर चौकात ही कंपनी आहे. विविध प्रकारची औषधे या कंपनीत बनविली जातात. त्यामुळे कंपनीअंतर्गत होत असलेल्या रासायनिक प्रक्रियांचा वास या परिसरात सर्वदूर पसरलेला असतो. या कंपनीत औषध उत्पादने करताना आवश्यक असलेला कच्चा माल कंपनीअंतर्गत विविध विभागात पाठविण्यासाठी येथे लिफ्ट बसविण्यात येत होती. या लिफ्टच्या कामाचे एका कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. ही लिफ्ट बसविण्यासाठी ठेकेदार कंपनीचे कामगार व सनफार्माचे काही कामगार त्यासाठी खड्डा खोदण्याचे काम करीत होते. बुधवारी दुपारी ब्रेकरद्वारे लिफ्टसाठी खोलवर खड्डा खोदण्याचे काम करीत असताना अचानक स्फोट होऊन आगीचे लोळ उठले. यावेळी खड्ड्यात चार कामगार काम करीत होते तर दोनजण वर होते. या आगीच्या लोळामध्ये त्या ठिकाणी काम करीत असलेले सर्व कामगार लपेटून गेले. मोठ्या आवाजामुळे कंपनीतील इतर कामगार मदतीला धावले त्यांनी या चारही कामगारांना लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर दोन कामगार भाजले गेले. ते अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

 या आगीमध्ये घटनास्थळाजवळ असणारे लोखंडी पत्र्याचे साहित्यही वितळून नुकसान झाले आहे. कंपनीत स्फोट झाल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे, एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल पवार हे घटनास्थळी आले. ही माहिती मिळाल्यानंतर या कंपनीत काम करीत असलेल्या कामगारांचे नातेवाईक कंपनीमध्ये आले. परंतु या घटनेबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने नातेवाइक संतप्त झाले होते. त्यामुळे या कंपनीच्या बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शिवसेना, राष्ट्रवादीसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *