facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Crime / कामगार मृत्यूप्रकरणी तिघांना अटक

कामगार मृत्यूप्रकरणी तिघांना अटक

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – कोंढवा बुद्रुक येथे ‘बेक्स अॅण्ड केक्स’ या बेकरीला आग लागून सहा कामगारांच्या मृत्यूप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात बेकरीच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, तिघांना अटकही करण्यात आली आहे.
अब्दुल मोहंमद युसूफ चिन्नीवार (वय २७,रा. कुमार होम्स, एनआयबीएम रस्ता, कोंढवा), मोहंमद तय्यब शहीद अन्सारी (वय २४, रा. हडपसर) आणि मोहंमद मुनीर चिन्नीवार (वय ५९, रा. पारगेनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अतुल सोनवणे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल चिन्नीवार याची कोंढवा परिसरातील तालाब चौकातील गगन अॅव्हेन्यू या इमारतीच्या तळमजल्यावर ‘बेक्स अ‍ॅण्ड केक्स’ बेकरी आहे. दोन वर्षांपासून ते येथे बेकरी चालवितात. मोहंमद तय्यब अन्सारी आणि मोहंमद मुनीर चिन्नीवार यांची बेकरीत भागीदारी आहे.
बेकरीमध्ये पाच कर्मचारी ठेवण्याची परवानगी असताना त्यांनी जास्त कामगार ठेवले. तसेच, आतील बाजूला बेकायदा पोटमाळा उभारला. त्यामुळे कामगारांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा ठपका ठेवून या तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) वर्षाराणी पाटील तपास करत आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे म्हणाले की, ‘बेकरीमध्ये बेकायदा पोटमाळा तयार करण्यात आला होता. शिवाय फायर ब्रिगेडचे ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नव्हते.’

सुविधा नसतानाही उद् घाटनाचा घाट

एकही गाडी तसेच कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली नसतानाही कोंढवा येथील अग्निशमन दलाच्या केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याची घाई करण्यात आली. उद्घाटनाच्या दिवशी केवळ दिखाव्यासाठीच परिसरात गाडी आणि कर्मचारी नेमण्यात आले.
या अग्निशमन केंद्रात कर्मचारी आणि गाडीची व्यवस्था असती तर, बेकरीला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला नसता. याला सर्वस्वी अग्निशमन दल आणि स्थानिक आमदार जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी केली आहे. कोंढवा येथील अग्निशमन दलाच्या केंद्राचे उद्घाटन गेल्या आठवड्यात १९ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते. उद्घाटनानंतरही केंद्रात एकाही कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याची तसदी अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी घेतली नाही. सद्य परिस्थितीत या केंद्रात एकही अग्निशमन दलाची गाडी नाही. अशी परिस्थिती असताना उद्घाटन करण्याची घाई कशासाठी केली, असा प्रश्न मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी उपस्थित केला.
केंद्र असतानाही तेथे कर्मचाऱ्याची नियुक्ती न केल्याने शुक्रवारी सकाळी या भागातील बेकरीला लागलेल्या आगीत सहा निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकाराला अग्निशमन दलाचे प्रमुख जबाबदार असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मोरे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी दिले. केवळ श्रेय घेण्यासाठी ज्यांनी उद्घाटनाचा दिखावा केला, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मोरे यांनी केली.

… तर प्राण वाचले असते

कोंढवा बुद्रुक येथील फायरब्रिगेड केंद्राचे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने दहा दिवसांपूर्वीच उदघाटन केले. मात्र, त्यानंतरही केंद्र कार्यान्वित झालेले नाही. केंद्र कार्यान्वित असते, तर बेकरीमध्ये आग लागल्यानंतर मृत पावलेल्या सहा कामगारांचे प्राण वाचले असते. दुर्घटनाग्रस्त बेकरी आणि फायरब्रिगेडचे केंद्र यामध्ये अवघ्या ५० मीटरचे अंतर आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वीच कोंढवा बुद्रुक येथील फायरब्रिगेड केंद्राचे काम पूर्ण झाले होते. तेव्हापासून ते सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, अपुरे मनुष्यबळ आणि साधनसामग्रीमुळे ते आजतागायत सुरू करण्यात आले नव्हते. मात्र, गेल्या आठवड्यात युतीने घाईघाईने केंद्राच्या उदघाटनाचा घाट घातला. भाजपच्यावतीने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १९ डिसेंबरला उदघाटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. उदघाटनासाठी आदित्य ठाकरे यांना बोलाविण्याच्या मागणीचा महापालिकेत विचार न झाल्याने शिवसेनेने माजी आमदार महादेव बाबर यांच्या हस्ते त्याच दिवशी सकाळी उदघाटनही केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्राचे उदघाटन टाळून अन्य कामांचे उदघाटन केले. उद् घाटनादिनी फायरब्रिगेडची एक गाडी केंद्रात आणण्यात आली होती. मात्र, नाट्यानंतर ती गाडी तेथून हलविण्यात आली आणि केंद्र पुन्हा वाऱ्यावर सोडण्यात आले.
हे केंद्र कार्यान्वित असते, तर रात्रपाळीच्या जवानांना निश्चितच या घटनेची माहिती तातडीने मिळाली असती. कारण, या बेकरी शेजारच्या किराणा व्यावसायिकाला पहाटे साडेचार वाजता घटनेची माहिती मिळाली. त्यानंतरच्या अर्ध्या, पाऊण तासात आग आटोक्यात आणून कामगारांना बाहेर काढण्यात आले होते. मात्र, त्यावेळी ते बेशुद्धावस्थेत होते. यावरून घटना खूप आधीच घडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘लोकप्रतिनिधी गेले कुठे’

फायरब्रिगेड केंद्र उभारणीचे श्रेय घेणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी उदघाटनानंतर ते केंद्र कार्यान्वित राहील, याची दक्षता घेतली असती तर जीवित हानी झाली नसती. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आता कुठे आहेत, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *