facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / ‘क्लेरा ब्रुस’ शासनाकडे

‘क्लेरा ब्रुस’ शासनाकडे

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – नगरमधील बहुचर्चित क्लेरा ब्रुस शाळेचे मैदान शासनाने ताब्यात घेतले आहे. २६ एकर क्षेत्र असलेल्या या जागेच्या मालकीबाबत न्यायालयात दाखल असलेल्या दाव्यांमध्ये अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित जागेचा ताबा महाराष्ट्र शासनाच्यावतीने नगरच्या तहसीलदारांकडे राहील, असा आदेश नगरचे तहसीलदार सुधीर पाटील यांनी दिला आहे. या आदेशानुसार संबंधित बदलाची नोंद संबंधित अभिलेखात घेण्याचेही त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
राहुरीच्या मराठी मिशन कंपाउंडचे धर्मगुरू रेव्हरंड सुभाष जाधव, राहुरी येथील ब्रदर अनिल पलघडमल व नगर येथील प्रवीण वाघमारे यांनी नगर शहराच्या स्टेशन रोडवरील मध्यवर्ती भागात असलेल्या २६ एकरातील क्लेरा ब्रुस शाळेचा जागा शासनाने ताब्यात घेण्यासाठी अर्ज केला होता. याप्रकरणी तहसीलदार पाटील यांनी या सर्वांचे तसेच दि अमेरिकन बोर्ड ऑफ कमिशनर फॉर फॉरेन मिशन व अन्य संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले. या सुनावणीनंतर संबंधित जागेच्या ताब्याबाबत वेगवेगळ्या न्यायालयात दावे सुरू असून, या जागेवर नेमका कोणाचा ताबा आहे याबाबत न्यायालयाचा निर्णय झालेला नाही. सद्यस्थितीत संबंधित मिळकतीवर कोणाचा ताबा आहे, याची खात्री होत नसल्याने तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा पोलिस अधीक्षकांचा अहवाल असल्याने न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यांबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित जागा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात राहील, असा आदेश तहसीलदार पाटील यांनी दिला आहे.
क्लेरा ब्रुसच्या जागेच्या हस्तांतरास धर्मादाय आयुक्तांची परवानगी नाही, संबंधित जागेचे व्यवहार बेकायदेशीर नोंदवले गेले आहेत, उताऱ्यावर बेकायदेशीर नोंदी केल्या गेल्या आहेत, संबंधित जागा कवडीमोल भावाने विकली गेल्याबाबत सक्तवसुली संचालनालयाकडे तक्रार केली आहे, संबंधित संस्थेवर न्यायालयाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे, अशा सात विविध मुद्यांच्या आधारे तहसीलदारांकडे दाद मागताना संबंधित जागा शासनाने ताब्यात घेण्याची मागणी जाधव, पलघडमल व वाघमारे यांनी केली होती. त्यांच्यावतीने येथील अॅड. रमेश सुपेकर यांनी विनामूल्य बाजू मांडली. त्यांना प्रेमानंद पाडळे यांनी सहकार्य केले. संबंधित जागेचा ताबा व वहिवाट मराठी मिशन ट्रस्टकडे असून, या मिळकतीच्या मालकीबाबत न्यायालयात दावे सुरू असल्याचे प्रतिवादींनी स्पष्ट केले होते. सर्व बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर तसेच पोलिसांनी दिलेल्या अहवालाचा विचार करून तहसीलदार पाटील यांनी संबंधित जागेचा न्यायालयाच्या अंतिम निकालापर्यंत ताबा महाराष्ट्र शासनाकडे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हाणामारीची चौकशी सुरू

तब्बल दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या क्लेरा ब्रुस शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व समाजसेविका पंडिता रमाबाई यांनी शिक्षण घेतलेले आहे. या जागेच्या मालकीचा वाद मागील अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. या जागेला मध्यंतरी कंपाउंड ठोकण्याचे सुरू असलेले काम रोखण्यासाठी काहीजण गेले असता तेथे हाणामारीची घटना घडली. मागील १० फेब्रुवारी २०१६ रोजी ही घटना घडल्यानंतर याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. या प्रकरणासह आणखी तीन गुन्हे दाखल असून ही सर्व प्रकरणे पोलिस तपासावर आहेत. शिवाय संबंधित जागेच्या मालकीबाबत न्यायालयात दावे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद करून या जागेवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अहवाल पोलिसांनी दिला होता. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर व सुनावणीतून सर्वांच्या बाजू ऐकल्यानंतर तहसीलदार पाटील यांनी संबंधित जमीन शासनाच्या ताब्यात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *