facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / दोन खुनातून लहेरिया निर्दोष

दोन खुनातून लहेरिया निर्दोष

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – जून २०१३ मध्ये शहरात विविध ठिकाणी झालेल्या सहा खुनांच्या घटनेनंतर पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी दिलीपसिंह कुँवरसिंह लहेरिया (वय ३२, रा. छत्तीसगढ) याची कोर्टाने दोन खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. तिसऱ्या गुन्ह्याची सुनावणी तीन जानेवारीपासून सुरू होणार आहे. मुख्य जिल्हा न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी हा निर्णय दिला. कोर्टाच्या या निर्णयामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, खरा आरोपी मोकाट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयावर उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती सरकारी वकील अॅड. अशोक रणदिवे यांनी दिली आहे.

कोल्हापूर शहरात मे आणि जून २०१३ मध्ये सहा फिरस्ते आणि भिकाऱ्यांचे डोक्यात दगड घालून खून झाल्याने खळबळ निर्माण झाली होती. सतत एकसारख्याच पद्धतीने होणाऱ्या खुनांमुळे शहरात सीरियल किलर वावरत असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला होता. यानुसार तपास करताना पोलिसांनी १९ जून, २०१३ रोजी व्हीनस कॉर्नर परिसरातून दिलीपसिंह कुँवरसिंह लहेरिया या संशयिताला अटक केली. मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने फिरस्त्यांचे खून केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. अधिक तपास करून पोलिसांनी त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन खून आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खुनाचे आरोपपत्र दाखल केले होते. गेली दोन वर्षे हा खटला जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. शुक्रवारी (ता. ३०) झालेल्या अंतिम सुनावणीत मुख्य जिल्हा न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी उपलब्ध पुरावे आणि दोन्ही बाजुंच्या वकिलांचा युक्त‌िवाद ऐकूण लहेरियाची दोन खुनातून निर्दोष मुक्तता केली, तर लक्ष्मीपुरीतील महिलेच्या खून खटल्याची सुनावणी ३ जानेवारीला होणार आहे.

सुनावणीदरम्यान संशयित आरोपीचे वकील अॅड. दत्ताजी कवाळे यांनी लहेरिया हा मनोरुग्ण असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणले. पोलिसांनी मीडिया आणि सामाजिक संस्थांच्या दबावापोटी लहेरिया याला अटक करून बळीचा बकरा बनवले. कोर्टात हजर केलेले पंच आणि साक्षीदारही पोलिसांच्या मर्जीतील असून, त्या पंचांवरच गंभीर गुन्हे दाखल असल्याचे कवाळे यांनी कोर्टात सिद्ध केले. ठोस पुराव्यांचा अभाव आणि संशयिताच्या वकिलांचा युक्त‌िवाद ग्राह्य धरून कोर्टाने लहेरिया याला २ खुनांच्या गुन्ह्यातून मुक्त केले. या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती सरकारी वकील अॅड. अशोक रणदिवे यांनी दिली.

३३ साक्षीदारांच्या साक्षी

संशयित लहेरिया याच्यावर १३ जून, २०१३ रोजी रेल्वे स्टेशनसमोर आणि १५ जून, २०१३ रोजी परिख पूल येथे फिरस्त्यांचे खून केल्याचा आरोप होता. याशिवाय १९ जून २०१३ रोजी लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नर परिसरात महिलेचा खून केल्याचाही आरोप लहेरिया याच्यावर आहे. या खून खटल्यात कोर्टात ३३ साक्षीदार सादर केले. यातील पलिसांनी सादर केलेल्या साक्षीदारांवरच गंभीर गुन्हे दाखल असल्याचे संशयिताच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिले.

खरा आरोपी मोकाट?

शहरात सीरियल किलरची दहशत निर्माण झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमातून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. राज्य सरकारनेही सलग झालेल्या खुनांची दखल घेऊन ३० जून, २०१३ रोजी मुंबई पोलिसांचे विशेष पथक तपासासाठी पाठवण्याचे जाहीर केले होते. यातून नाचक्की होऊ नये, म्हणून कोल्हापूर पोलिसांनी दिलीप लहेरिया या फिरस्त्याला बळीचा बकरा बनवल्याचा युक्त‌िवाद संशयिताचे वकील कवाळे यांनी केला आहे. कोर्टाने लहेरियाला निर्दोष मुक्त केल्याने खरा आरोपी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी केलेला तपासही संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून, कोर्टात सादर केलेल्या साक्षीदारांबाबतही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. याच प्रकरणात शाहूपुरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रतनसिंग रजपूत आणि सहायक पोलिस निरीक्षक कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाईदेखील झाली होती.

दबावापोटीच पोलिसांनी निर्दोष फिरस्त्याला पकडून खरा आरोपी पकडल्याच्या वल्गना केल्या होत्या. तिसऱ्या गुन्ह्यात लहेरिया निर्दोष असल्याची मला खात्री आहे. ठोस पुरावे नसतानाही पोलिसांनी जाणीवपूर्वक संशयिताला अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.

अॅड. दत्ताजी कवाळे, संशयित लहेरियाचे वकील

आम्ही पुरेसे पुरावे कोर्टात सादर केले होते, त्याचबरोबर साक्षीदारांच्या साक्षीही मांडल्या. कोर्टाच्या दयेमुळेच संशयित लहेरिया दोन खुनांमध्ये निर्दोष सुटला आहे. आम्ही या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात दाद मागणार आहे.

अॅड. अशोक रणदिवे, सरकारी वकील.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *