facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / सूरजागड प्रकल्प पूर्ण होणारच

सूरजागड प्रकल्प पूर्ण होणारच

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – गडचिरोली जिल्ह्यासह सिरोंचासारख्या मागास भागावर माझे प्रेम असून, या भागाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. सुरजागड प्रकल्पाला विरोध करणारे माओवादी जनविरोधी असून, कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. २८ वर्षांनंतर काेणत्याही मुख्यमंत्र्यांनी या नक्षली भागाचा दाैरा केला.

महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा सिरोंचाजवळच्या चिंतलपल्ली घाटावर राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, तेलंगणाचे बांधकाममंत्री तुम्माला नागेश्वरराव, गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अमरिश आत्राम यांच्यासह गडचिरोलीचे खासदार अशोक नेते याप्रसंगी उपस्थित होते. पुलाच्या लोकार्पणानंतर प्राणहिता आणि इंद्रावती नदीवरील पुलाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळाही पार पडला.

गोदावरी नदीवर पूल झाल्याने तेलंगणात लवकर पोहोचता येत असले तरी स्वतः अनेकदा याच नदीतून नावेतून प्रवास केल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली. जिल्ह्यात सुरजागडसारख्या लोहखनिजावर आधारित प्रकल्पातून हजारोंना रोजगार मिळणार असल्याने तो होणे आवश्यक आहे. जाळपोळ, हिंसा करणारे माओवादी जनविरोधी आहेत, अशी टीका त्यांनी केली. तसेच मेडीगड्डा प्रकल्पात कुठलेही नुकसान होणार नसल्याचे सांगत तेलंगणाने सहकार्य केल्यास दोन राज्यांच्या मदतीने सीमावर्ती भागात विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, हिंसेच्या आड रस्त्यासह इतर विकास प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांनी आदिवासींचा जनाधार गमावला आहे. या भागात हिंसा करण्याऐवजी माओवाद्यांनी शस्त्रे सोडून विकासात समाविष्ट व्हावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.

पहिल्यांदाच मंत्र्यांची मांदियाळी

सिरोंचा हा राज्याच्या सीमेवर व विकासापासून दूर असलेला तालुका आहे. शरद पवार आणि आर. आर. पाटील वगळता मोठ्या मंत्र्यांनी कधीच या भागाचा दौरा केलेला नाही. पुलाच्या उदघाटनानिमित्त राज्यपालांसह अनेक मंत्र्यांनी सिरोंचाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *