facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / हिवरेबाजार वाचवणार ६ कोटी लिटर पाणी

हिवरेबाजार वाचवणार ६ कोटी लिटर पाणी

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजारने येत्या वर्षभरात तब्बल ६ कोटी लिटर पाणी वाचविण्याचे ध्येय ठेवले आहे. गावात सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचा ताळेबंद आज सायंकाळी गावात झालेल्या ग्रामसभेत मांडला गेला. या ताळेबंदात गावातील पिके तसेच पिण्याच्या पाण्याचे नियोजन मांडले गेले. या नियोजनानुसार गावात सुमारे ६ कोटी लिटर पाणी शिल्लक राहणार असल्याचे स्पष्ट केले गेले आहे.

आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये दरवर्षी वर्षाखेरीच्या दिवशी ग्रामसभा घेऊन मागील वर्षभरात ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची माहिती दिली जाते व येणाऱ्या वर्षात करावयाच्या कामांचे नियोजन सादर केले जाते. या ग्रामसभेत गावातील पाण्याचा हिशेब मांडला जातो. आदर्शगाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी लोकसहभागातून गावाच्या केलेल्या सर्वांगीण विकासात पाण्याचा हा मांडला जाणारा ताळेबंद वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो.

प्रत्येक थेंबाचे स्पष्टीकरण

हिवरेबाजार ग्रामपंचायतीने गावात पडणाऱ्या पावसाच्या जवळपास प्रत्येक थेंबाचे स्पष्टीकरण ताळेबंदात दिले आहे. गावाच्या शिवारात २५४ मिलीमीटर पाऊस झाल्याने २४८ कोटी १२ लाख लिटर पाणी उपलब्ध झाल्याचे यात स्पष्ट केले आहे. यातील एक थेंबही पाणी वाहून जाणार नाही, असा दावाही केला गेला आहे. ८६.८४ कोटी लिटर पाण्याची वाफ होणार आहे, जमिनीवर शेवटपर्यंत साठून राहणारे पाणी १२.४१ कोटी लिटर असणार आहे, जमिनीत आपोआप मुरणारे पाणी २४.८१ कोटी लिटर असेल, जमिनीत ओलाव्याच्या स्वरुपात राहणारे पाणी ७४.७३ कोटी लिटर असेल व जलसंधारण कामामुळे जमिनीत मुरणारे अधिकचे पाणी १९.६२ कोटी लिटर असल्याने असे सगळे मिळून गावासाठी प्रत्यक्ष उपलब्ध पाणी १६१.२७ कोटी लिटर असेल, असा हिवरेबाजार ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.

आवश्यकताही स्पष्ट

हिवरेबाजार गावात उपलब्ध असणाऱ्या पाण्यापैकी गावाला प्रत्यक्ष आवश्यक असलेल्या पाण्याचा हिशेब मांडताना गावातील ग्रामस्थ तसेच पाळीव जनावरे यांना पिण्यासाठी ४.२७ कोटी लिटर पाणी आवश्यक असून, शेतीसाठी १४७.९० कोटी लिटर पाणी गरजेचे आहे. तसेच बिगरशेती वापरासाठी ३.२३ कोटी लिटर पाणी आवश्यक असल्याने या तिन्ही गरजा मिळून गावाला १५५.३९ कोटी लिटर पाणी गरजेचे आहे. उपलब्ध १६१.२७ कोटी लिटर पाण्यापैकी केवळ १५५.३९ कोटी लिटर पाण्याची गावाला गरज भासणार असल्याने यातून ५.८८ कोटी लिटर पाणी शिल्लक राहणार असल्याचाही दावा या ताळेबंदाद्वारे केला गेला आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *