facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / ‘कचरा टाकल्यास आत्मदहन करू’

‘कचरा टाकल्यास आत्मदहन करू’

जयसिंगपुरात मंगळवारी कचऱ्याचा प्रश्न आणखीनच गंभीर बनला. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कचराडेपोत कचरा टाकू द्यावा, अशी विनंती नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांनी चिपरी ग्रामस्थांना केली, मात्र ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. चिपरी हद्दीत कचरा टाकल्यास प्रसंगी आत्मदहन करू, असा इशारा दिला. तत्पूर्वी कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्याने डॉ. माने यांनी पालिकेची तातडीची विशेष सभा बोलाविली होती.

पाच वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी जयसिंगपूर शहरातील कचरा टाकण्यासाठी चिपरी हद्दीत दगड खणीची जागा दिली आहे. येथील कचऱ्याने पाणी, हवा यांचे प्रदूषण व शेतीचे नुकसान होत असल्याने परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. एक जानेवारी रोजी चिपरी ग्रामस्थांनी कचरा डेपोकडे जाणारा रस्ता चरखोदाई करून बंद केला. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून जयसिंगपूर शहरात कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात तुंबलेला कचरा कोठे टाकायचा, असा प्रश्न नगरपालिकेसमोर निर्माण झाला आहे.

दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांनी मंगळवारी पालिकेची तातडीची सभा बोलाविली होती. या सभेत नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने चिपरी येथे जाऊन ग्रामस्थांची भेट घेण्याचे ठरले. त्यानुसार नगराध्यक्षा डॉ. नीता माने, ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद बजरंग खामकर, नगरसेविका अॅड. सोनाली मगदूम, शीतल गतारे यांच्यासह अन्य सदस्यांच्या शिष्टमंडळाने चिपरी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शेतकऱ्यांची भेट घेतली.

जयसिंगपूर शहरातील कचराप्रश्न गंभीर बनत चालला आहे, पर्यायी जागेची व्यवस्था आम्ही करीत आहोत, असे सांगत थोड्या कालावधीची मुदत आम्हाला द्यावी, अशी विनंती नगराध्यक्षा डॉ. माने व नगरसेविका अॅड. सोनाली मगदूम यांनी ग्रामस्थांना केली. मात्र, जयसिंगपूर नगरपालिकेकडे पर्यायी व्यवस्था असल्याचे वेगवेगळी कागदपत्रे दाखवित ग्रामस्थांनी सिद्ध केले. त्यामुळे तुमचा कचरा पालिकेसमोर टाका किंवा दसरा चौकात टाका, पण आमच्या गावात तुमचा कचरा नको. तुमच्या कचऱ्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात का ? असा सवाल ग्रामस्थांनी केला. तसेच कचरा टाकण्यास ठाम विरोध दर्शविला. कचरा टाकल्यास अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा इशाराही दिला. त्यामुळे नगराध्यक्षांची ही शिष्टाई असफल ठरली. यामुळे शहराच्या कचऱ्याचा प्रश्न मात्र आणखीनच गंभीर बनला आहे.

चौकट

पालिका सभेत प्रशासन धारेवर

कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दुपारी दीड वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली होती. या सभेतही कचऱ्याच्या विषयावर वादळी चर्चा झाली. कचरा डेपोत योग्य पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळेच हा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. कचरा पूर्णपणे आत न ढकलल्याने ही प्रशासनाची चूक आहे, त्यामुळे प्रदूषण होत असल्याचे संजय पाटील-यड्रावकर म्हणाले. घनकचरा व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप असलम फरास यांनी केला.

घंटागाड्या ठप्प

शहरातील कचरा भरलेल्या पालिकेच्या गाड्या पाण्याच्या टाकीजवळ उभ्या होत्या. कचरा टाकायचा कोठे असा प्रश्न निर्माण झाल्याने मंगळवारी कचरा संकलित करण्यासाठी घंटा गाड्या शहरात फिरल्या नाहीत. तसेच कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगाही निघाला नाही. यामुळे शहरातील हा प्रश्न आणखीनच गंभीर बनला आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *