facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / नोटाबंदीमुळे व्यावसायिक, शेतकऱ्यांची कोंडीराष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचा आरोप

नोटाबंदीमुळे व्यावसायिक, शेतकऱ्यांची कोंडीराष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचा आरोप

‘केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाने सर्वसामान्य जनतेसह छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायाची कोंडी केली आहे. ३१ डिसेंबरच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला अर्थिक कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग जाहीर करतील, असे वाटले होते. पण, तसे झाले नसल्याने शेतकऱ्यांपासून समाजातील विविध घटकात असलेला असंतोष व्यक्त करण्यासाठी नऊ जानेवारी रोजी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिली.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बोलविलेल्या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगून जयंत पाटील म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांचा माल पडून नासून गेला. दुसऱ्या टप्प्यात कवडीमोल भावाने तो विकावा लागला. काहीवेळा उभी पिके नांगरुन टाकावी लागली. अद्यापही व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. ग्रामीण जनतेशी अर्थिक नाळ जोडणाऱ्या जिल्हा बँकाचा ग्राहक राष्ट्रीयकृत बँकाकडे वळविण्याचा प्रयत्न केला. शेतकरी मोडून पडला, मजूर बेरोजगार झाला, छोटा मोठा व्यवसायिक गप्प बसला, या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे.’

मोहनराव कदम भांबावले

‘काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम हे अधिक परिपक्व आहेत. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये राज्यात मित्रपक्षाबरोबरची आघाडी करायची की नाही, या बाबत ते विशेष मत व्यक्त करू शकतात. इतर कोणी बोलत असेल तर त्याची दखल घेण्याची आवश्यकता वाटत नाही. काही मंडळी नव्याने मुंबईत गेल्याने भांबावलेली आहेत,’ अशी टीका जयंत पाटील यांनी आमदार मोहनराव कदम यांच्यावर केली.

शेट्टी, सदाभाऊंना शेतकऱ्यांचे नुकसान दिसत नाही

खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले, ‘साहेब सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांना दोन महिन्यांत झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आता दिसत नाही. त्यांचा अभ्यास मोठा आहे. शेतकऱ्यांना झळ बसली आहे, असे त्यांना वाटत नाही तर दुसरे शेतकऱ्यांचे नेते राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उत्पन्न वाढल्यामुळे शेतीमालाचे दर कोसळल्याचा शोध लावला आहे. त्यांच्यात एक वाक्यता नाही. ऊस आंदोलनात शेतकऱ्यांना पैसे लागतात असे सांगणारे हे नेते सत्तेत गेल्यानंतर मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पैसे लागत नसल्याचे सांगत आहेत. सांगलीच्या समाजकारणात वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, गुलाबराव पाटील ही माणसे जनतेसाठी आयुष्य वेचल्याने नेते झाली आहेत. आता सत्तेत गेलेले आपले नेतेपण सिद्ध करण्यासाठी त्या थोर नेत्यांबाबत टीकात्मक बोलू लागली आहेत. सत्ता आल्यावर माणसाने भान सोडून वागू नये. सत्ता येते आणि जाते, त्यामुळे जमीन कधी सोडायची नसते. ज्यांना भान राहिलेले नाही, अशीच माणसं बेताल बोलतात, अशी टीकाही पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केली.

जिल्हा परिषद स्वबळावर

राष्ट्रवादी कोणाकडेही आघाडी करा म्हणून गेली नसताना अस्तित्व नसलेल्या काँग्रेसने आम्ही राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणार नाही, असा कांगावा सुरू केला आहे. केवळ आव आणणाऱ्या काँग्रेसचा जिल्ह्यात दोन तालुके वगळता कोठेही प्रभाव नाही. त्यामुळे कोणी काहीही म्हणत असले तरी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच बहुमतात असणार आहे आणि अध्यक्षही राष्ट्रवादीचाच असेल. पूर्वी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले स्थानिक नेतृत्व बाजूला गेले असले तरी राष्ट्रवादी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून इतरांना बरोबर घेणार नाही. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते बरोबर राहतील. आर. आर. पाटील नाहीत म्हणून राष्ट्रवादी दुबळा झाला, असे कोणी समजायचे कारण नाही.

ज्येष्ठांना अल्टिमेटम अयोग्य

सांगलीच्या जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणा, तुम्हाला मंत्रिपद देतो, असा अल्टिमेटम शिवाजीराव नाईक यांच्या सारख्या ज्येष्ठांसमोर ठेवणे बरोबर नाही. जे घडणार नाही, त्याची आश्वासने देऊन कोड्यात टाकणेही बरोबर नाही, अशी टिप्पणी जयंत पाटील यांनी केले. सह पालकमंत्रिपद हा एक नवा प्रकार सरकारने समोर आणला आहे. किती अवमान करून सत्तेत राहायचे हे शिवसेने ठरवावे. राज्यात, देशात आपले सरकार काय करते आहे, हे ही माहित नसलेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी जनधन योजनेच्या खात्यात पाच हजार रुपये भरल्याचे जाहीर केले आहे. कुठून तरी तुमच्या खात्यावर पैसे येणार आहेत, अशी अशा दाखवून सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळण्यातला हा प्रकार आहे.

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *