facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / अहमदनगर / पुतळे अतिक्रमणाच्या विळख्यात

पुतळे अतिक्रमणाच्या विळख्यात

महापुरुषांच्या जयंती वा पुण्यतिथीदिनी फुलांनी सजणारे महापुरुषांचे पुतळे अन्य वेळी मात्र पार्किंग व अतिक्रमणाच्या विळख्यात असतात. शहरातील बहुतांश पुतळ्यांच्या अवतीभोवती छोट्या-मोठ्या वाहनांचे पार्किंग, अस्ताव्यस्त खाद्यपदार्थांच्या गाड्या लावण्यात आल्या असून त्यांची सुरक्षाही धोक्यात असल्याचे ‘मटा’च्या पाहणीत निदर्शनास आले.
पुणे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये असणारे महापुरुषांचे पुतळे सुरक्षित आहेत का, याबाबतची पाहणी केली असता शहरातील बहुतांश पुतळे हे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे अनेक पुतळ्यांभोवती सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसून पुतळ्याजवळ अगदी कोणालाही सहज प्रवेश मिळत आहे. वाडिया पार्क परिसरामध्ये महात्मा गांधी व हिराबाई भापकर यांचे पुतळे आहेत. यापैकी गांधींजींच्या पुतळ्यासमोर सर्रास पार्किंग करण्यात येते. येथे तासनतास गाड्यावर बसून गप्पा मारण्यात मग्न असणारे नागरिक दिसतात. तर, येथून जवळच असणाऱ्या हिराबाई भापकर पुतळ्याभोवती तर कोणत्याही प्रकारचे कुंपन करण्यात आले नाही. सध्या याठिकाणी पुतळा उभारण्यासाठी नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत हिराबाई भापकर यांच्या पुतळ्याच्या सुरक्षेचा विचार करुन उपाययोजना करण्याची गरज होती. प्रत्यक्षात मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
माणिक चौकामध्ये असलेला सेनापती बापटांचा पुतळाही पार्किंगच्या विळख्यात आहे. मंगळवारी एक मुलगा या पुतळ्याच्या भोवती असणारे कपाऊंड पार करून पुतळ्याजवळ उभा राहून पतंग उडवत होता. परंतु संबंधित मुलाला कोणीही हटकले नाही. या पुतळ्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर कोतवाली पोलिस स्टेशन असतानाही पुतळ्याभोवती करण्यात येणाऱ्या बेकायदा पार्किंगकडे दुर्लक्ष होत आहे. पटवर्धन चौकामध्ये असणारा रावसाहेब पटवर्धन यांचा पुतळ्याभोवतीच्या परिसराची सुद्धा दुर्दशा झाली आहे. याठिकाणी तर नागरिकांनी कपडे वाळू घातले असल्याचे आढळले. शिवाय पुतळ्याभोवती खाद्यपदार्थ्यांची गाडी लागली असून येथेही सर्रास पार्किंग करण्यात येते. स्वामी विवेकानंद चौकामध्ये असणारा स्वामी विवेकानंदांचा पुतळा व चौपाटी कारंजा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोरही पार्किंग करण्यात येते. या ठिकाणीही कोणालाही अगदी सहज प्रवेश मिळू शकतो. महापुरुषांचा सन्मान कायम रहावा, यासाठी तरी मनपा प्रशासनाने येथील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *