facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / नाशिक / बॉटनिकल गार्डन बघण्यासाठी आता मोजा पैसे!

बॉटनिकल गार्डन बघण्यासाठी आता मोजा पैसे!

नाशिकच्या वैभवात भर टाकणाऱ्या अन् पर्यटकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या बॉटनिकल गार्डनसाठी अखेरीस महापालिकेने प्रवेश दर निश्चित केले आहेत. बॉटनिकल गार्डन पाहण्यासाठी प्रतिव्यक्ती ३० रुपये, तर बोलक्या झाडांचा रात्रीचा शो पाहण्यासाठी प्रतिव्यक्ती ५० रुपये प्रवेश दर निश्चित करण्यात आला आहे. पाच वर्षांखालील मुलांना मात्र प्रवेश मोफत राहणार आहे. हे दर येत्या सोमवारपासून लागू होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने टाटा फाउंडेशनच्या मदतीने बॉटनिकल गार्डनला सुशोभीत केले आहे. या गार्डनमध्ये कृत्रिम प्राणी बसविण्यासह सायकल ट्रॅक, लेझर शोची निर्मिती केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व सिनेअभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते या गार्डनचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले असून, ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. टाटा फाउंडेशनने या गार्डनच्या कामावर जवळपास पाच कोटी रुपये खर्च केले असून, दरवर्षी त्याची देखभालही केली जाणार आहे. गार्डनमध्ये उभारलेल्या बोलक्या झाडांच्या लेझर शोचा खर्च हा वर्षाला ३५ ते ४० लाख रुपये आहे. तर पूर्ण बॉटनिकल गार्डनच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वर्षाला एक कोटी ते सव्वा कोटीपर्यंत खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे हा खर्च पर्यटकांकडून घेतला जाणार आहे.

बॉटनिकल गार्डनमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा दर निश्चित करण्यासाठी मंगळवारी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा व आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी एकत्रित बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. त्या बैठकीत गार्डनच्या पाहणीसाठी प्रतिव्यक्ती ३० रुपये, तर लेझर शोसाठी स्वतंत्र प्रतिव्यक्ती ५० रुपये दर निश्चित केले. पाच वर्षांखालील लहान मुलांना मात्र कोणताही दर आकारला जाणार नाही. या ठिकाणी उभारलेल्या सायकल ट्रॅकसाठी एक सायकलसाठी प्रतितास दहा रुपये, तर डबलशीट सायकलसाठी प्रतितास २० रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. या दरांवर समितीने शिक्कामोर्तब केले असून, येत्या सोमवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.

…तर मोफत प्रवेश

गार्डनच्या वर्षभराच्या देखभालीसाठी जवळपास एक कोटींच्या वर खर्च अपेक्षित आहे. हा खर्च शहरातील काही उद्योजक व बांधकाम व्यावसायिकांनी उचलण्याची तयारी दर्शवली असून, त्या बदल्यात त्यांना आपल्या ब्रँडची जाहिरात या ठिकाणी करता येणार आहे. आयुक्त कृष्णा यांनी संबंधित संस्थांना याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. पालिकेने हा प्रस्ताव मान्य केल्यास पर्यटकांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

पार्किंगवरही तोडग्याचा प्रयत्न

या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने पार्किंगअभावी पर्यटकांचे हाल होत आहेत. त्यामुळे गार्डनच्या आतमध्ये टू व्हिलर पार्किंग करण्याची तयारी पालिकेने केली आहे. फोरव्हिलर पार्किंगसाठी फाळके स्मारकाचा विचार केला जात आहे.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *