facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / नागपूर / राज्यातील पक्षिमित्र अंबेजोगाईला एकत्र

राज्यातील पक्षिमित्र अंबेजोगाईला एकत्र

येत्या ७ आणि ८ जानेवारीला राज्यभरातील पक्षिमित्र अंबेजोगाई येथे एकत्र येणार आहेत. पक्ष्यांविषयीच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी राज्यस्तरीय पक्षिमित्रांचे संमेलन या दोन दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील तमाम पक्षिमित्रांना एकत्र आणून पक्षिमित्र चळवळ अधिक मजबूत करणे, पक्षी संवर्धन, संशोधनाला चालना देऊन पक्षिमित्रांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे यासाठी १९८२ साली महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना स्थापन करण्यात आली होती. आजपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात २९ संमेलने झाली असून यावर्षीचे ३० वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अंबाजोगाई येथे युथ एनव्हायर्नमेंट सोसायटी (येस) च्या यजमानपदाखाली होत आहे. मराठवाड्यातील गेल्या काही वर्षातील दुष्काळ पाहता ‘प्रतिकूल परिस्थितीत पक्ष्यांचे संवर्धन व संगोपन’ ही या वर्षीच्या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठवाड्यातील जेष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. विजय दिवाण यांची निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्ष म्हणून अंबेजोगाईचे नंदकिशोर मुंधडा हे असणार आहेत. या संमेलनास महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष भाऊ काटदरे, माजी संमेलनाध्यक्ष शरद आपटे, विभागीय वनाधिकारी अमोल सातपुते हे संमेलनाच्या उद्घाटनास उपस्थित असणार आहेत.

या संमेलनापासून संस्थापक डॉ. प्रकाश गोळे स्मृती व्याख्यानाचेही आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी ‘ग्लोबल वार्मिंगचा पक्ष्यांवर होणारा परिणाम’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी पुण्याचे पक्षी अभ्यासक तथा माजी संमेलनाध्यक्ष डॉ. संजीव नलावडे हे येणार आहेत. याशिवाय या दोन दिवसीय संमेलनात सांगलीचे शरद आपटे, अमरावतीचे किरण मोरे, नागभीडचे नरेंद्र लोहबरे, बीएनएचएसचे डॉ. राजू कसंबे व नंदकिशोर दुधे, लातूरचे धनंजय गुट्टे, नगरचे सुधाकर कुऱ्हाडे, सुभाष पुराणिक हे तज्ज्ञ विविध विषयांवर सादरीकरणे करतील. विदर्भातील नागपूरचे डॉ. अनिल पिंपळापुरे, अमरावतीचे डॉ. जयंत वडतकर, प्रा. गजानन वाघ यांची संमेलनात विशेष उपस्थिती असणार आहे. संमेलनास राज्यभरातून पक्षिमित्रांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र पक्षिमित्रचे संमेलन समन्वयक डॉ. जयंत वडतकर यांनी केले आहे.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *