facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / नगरकरांना भरली हुडहुडी; पारा ४.९ अंशांवर

नगरकरांना भरली हुडहुडी; पारा ४.९ अंशांवर

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – नगरकरांसाठी मंगळवारची (३ जानेवारी) रात्र सर्वाधिक थंडीची ठरली. या काळात नगरमध्ये किमान तापमान ४.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. देशातील या दिवशीच्या ‘टॉप टेन’ थंड ठिकाणांमध्ये नगरचा दुसरा क्रमांक लागला आहे. या वर्षीच्या हिवाळ्यातील हे नीचांकी तापमान असून जानेवारीत नोंदल्या जाणाऱ्या नीचांकी तापमानाचा गेल्या सहा वर्षांतील हा विक्रम ठरला आहे.

नव्या वर्षाच्या पहिला आठवड्यातही नगरमध्ये थंडी जाणवत होती. मंगळवारी पारा जानेवारीतील सरासरी तापमानाच्या तुलनेत सात अंशाने घसरला. त्यामुळे कमालीची थंडी जाणवली. भल्या पहाटे घराबाहेर पडलेल्यांना थंडाचा कडाका सहन करावा लागला. सूर्योदयानंतर मात्र, तापमानात वाढ होत गेली. सकाळी हवामान खात्याच्या संकेतस्थळावर किमान तापमानाची नीचांकी नोंद पाहिल्यावर या नगरचा देशात दुसरा क्रमांक असल्याचे आढळून आले. हरयानामधील नारनाऊल येथे ४.५ अंश सेल्सिअस असे देशाच्या सपाट भागातील नीचांकी तापमान नोंदले गेले आहे.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वोत्तर दिशेने वाहणारे थंड व कोरडे वारे हे थंडीचे कारण आहे. तर जम्मू-काश्मीरसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये झालेला पाऊस आणि बर्फवृष्टी हे अचानक थंडीत वाढ होण्याचे कारण आहे. देशात कमी तापमान नोंदल्या गेलेल्या दहा ठिकाणांमध्ये मध्यप्रदेशातील सर्वाधिक ४, हरयानामधील ३, पंजाबमधील २ तर महाराष्ट्रातील एका ठिकाणाचा समावेश आहे. उत्तर व मध्य भारतात किमान तापमानात उल्लेखनीय घट झालेली आहे. राज्यातील अन्य शहरांचे तापमानही घटले असेल तरी नगरमधील घट लक्षणीय आहे. नगरचे भौगोलिक स्थान यामागील कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. येथील स्वयंचलित हवामान केंद्र खोलगट भागात आहे. शिवाय नगर शहराभोवती उंच डोंगर असून त्यावरून खाली आलेली थंड हवा शहरात स्थिरावत असल्याने थंडी जाणवत असल्याचे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. गेल्यावर्षी पाऊस चांगला झाल्याने पाणी उपलब्ध आहे, शेतात पिके आहेत, त्यामुळे बाहेरून आलेली थंड हवा गरम न होता दीर्घ काळ थंड राहत असल्याने थंडीसाठी अनुकूल वातावरण असल्याचे दिसून येते.

मंगळवारी रात्री नोंदले गेलेले किमान तापमान या हिवाळ्यातील नीचांकी तापमान ठरले आहे. यापूर्वी २०११ मध्ये ७ जानेवारीला नगरला १.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाकडे उपलब्ध आहे. जानेवारी महिन्याचे सरासरी किमान तापमान १२.३ अंश सेल्सिअस असते. बुधवारी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे रात्री आणि पहाटेचा कडाका वगळता दिवसभर थंडीची जाणीव झाली नाही. पहाटे पाणीपुरवठा होणारा भाग, साफसफाईचे काम, दूधवाले यांच्या कामावर थंडीचा परिणाम झाल्याचे आढळून आले.

जानेवारीतील किमान तापमान

(अंश सेल्सिअसमध्ये)

२०१६ : ९.४

२०१४ : ८.०

२०१३ : ७.१

२०१२ : ५.३

२०११ : १.८

२०१० : ६.३

२००९ : ८.४

२००८ : ७.१

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *