facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / लतादीदी लाइव्ह…पण फेसबुकवर!

लतादीदी लाइव्ह…पण फेसबुकवर!

घडाळ्याचा काटा साडेसातकडे पोहोचताना देश-विदेशातील लाखो डोळे फेसबुककडे लागले होते. साक्षात गानकोकिळा लता मंगेशकर लाइव्ह येणार असे त्यांनी स्वतःच फेसबुक आणि ट्विटरवरून दुपारीच जाहीर केले होते. त्या काय गप्पा मारतील, कोणत्या प्रश्नांची उत्तरे देतील, गाणे म्हणून दाखवतील का, अशी उत्सुकता चाहत्यांच्या मनात होती. गेल्या दोन वर्षांमध्ये प्रकृतीमुळे त्यांची जाहीर कार्यक्रमांमधील उपस्थितीही कमी झाली होती. बुधवारी सायंकाळी ठरल्यावेळी फेसबुकवरून त्या लाइव्ह आल्या आणि त्यांचे जगभरातील चाहते भारावले. लतादीदी फेसबुक आणि ट्विटरवरून चाहत्यांशी संपर्कात असतात मात्र अशा पद्धतीने पहिल्यांदाच त्यांनी लाइव्ह गप्पा मारल्या.

फेसबुकच्या माध्यमातून या गप्पा ऐकताना चाहत्यांना मोठा खजिना गवसल्याचा आनंद मिळाला. १६ मिनिटे त्या गप्पा रंगल्या. चार जानेवारी ही आर. डी. बर्मन यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून दीदींनी या गप्पांना सुरुवात केली. आरडी हे श्रेष्ठ संगीतकार होते. त्यांना चाहत्यांचे अफाट प्रेम लाभले मात्र शेवटच्या क्षणी सर्वांनी त्यांची साथ सोडली याची खंत दीदींनी यावेळी व्यक्त केली.

संगीतकार मदन मोहन यांच्याबद्दलची आठवण सांगण्याची विनंती त्यांना एका चाहत्याने केली. ‘ते अत्यंत उत्तम स्वयंपाक करायचे आणि मला खाऊ घालायचे,’ अशी आठवण त्यांनी सांगितली. माझे हे सगळे जीवलग मला सोडून गेले, याचे दुःख असल्याचे सांगताना त्या क्षणभर भावूक झाल्या. यश चोप्रांबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, माझी गाणी घेतल्याशिवाय त्यांनी चित्रपट बनवला नाही.

या गप्पांमध्ये जगभरातील त्यांचे चाहते ऑनलाइन सहभागी झाले होते. त्यामुळे सिंगापूरचे खाणे, लंडनचे शॉपिंग, कॅनडाचे सौंदर्य, बहारीनमधील शो अशा आठवणी त्यांनी उलगडल्या. ‘तुम्हीच खऱ्या भारतरत्न आहात,’ असे म्हटल्यावर ‘चित्रपटसृष्टीमध्ये येऊन यंदा ७५ वर्षे होत आहेत आणि या कालावधीत तुम्ही दिलेल्या प्रेमामुळेच मी भारतरत्न झाले,’ असे कृतज्ञतेचे उद्गार त्यांनी काढले.

घरातील मोठ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना स्वतःपासून दूर करू नका, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. गप्पांची सांगता करताना पुन्हा गप्पा मारण्याचे आश्वासन दिल्याने आणखी काही आनंदाचे क्षण आयुष्यभर जपण्यासाठी मिळणार असल्याची खात्री चाहत्यांना पटली.

‘सराफा’त दहीवडे

लतादीदींच्या एका चाहत्याने त्यांना इंदूरची आठवण विचारली. तेव्हा त्यांनी जन्म इंदूरचा असल्याचे सांगत या शहराबद्दलची ओढ व्यक्त केली. मावशीसोबत तिथे जाऊन जायचे, असे सांगत त्यांनी इंदूरच्या सराफ्यावर जाऊन दहीवडे खायचे, ते मला आवडायचे असेही आवर्जून सांगितले. गप्पांच्या वेळी शेजारीच असलेल्या उषा मंगेशकर यांना त्यांनी, ‘सराफा’ हा शब्द न आठवल्याने, ‘काय ग उषा म्हणतात त्याला?’ असा मराठीतून त्यांना प्रश्न विचारत त्या गप्पांमध्ये पुन्हा सामील झाल्या.

हिट्स आणि लाइक्सचा वर्षाव

दीदींच्या गप्पा लाइव्ह सुरू असताना साडे पाच हजारांहून जास्त चाहत्यांनी त्यांच्या या गप्पा ऐकल्या. त्यानंतर हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला. पहिल्या तासाभरात ३४ हजार लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला तर तब्बल १ लाख २९ हजारांनी हा व्हिडिओ पाहिला. १२ हजार चाहत्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. अडीच हजारांहून जास्त चाहत्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आणि पुढे होतच राहिला.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *