facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / पुणे / विरोधी पक्षनेत्याची ‘मनसे’ची मागणी

विरोधी पक्षनेत्याची ‘मनसे’ची मागणी

महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सभासदांची संख्या काँग्रेसपेक्षा अधिक असल्याचे विरोधी पक्षनेतेपद मनसेला द्यावे, अशी मागणी मनसेचे पालिकेतील गटनेते किशोर शिंदे यांनी महापौरांकडे केली आहे. पालिकेत मनसेच्या नगरसेवकांची संख्या २७ आहे, तर काँग्रेसकडे २३ नगरसेवक आहेत.
पालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करताना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे नोंदणी केल्याने पालिकेत सत्तेत सहभागी असतानाही विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे देण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ मनसेचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाल्याने विरोधी पक्षनेतेपद मनसेकडे आले होते. त्यानंतर सहा महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने विजय मिळविल्याने मनसे आणि काँग्रेसच्या सदस्यांची संख्या समान झाली होती. त्यावेळी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याचे सांगून महापौरांनी विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला दिल्याने अरविंद शिंदे या पदावर विराजमान झाले होते.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या पक्षातील सहा नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ केल्याने पालिकेतील काँग्रेसच्या सभासदांची संख्या २३वर आली आहे. मनसेच्या एका नगरसेविकेने राजीनामा दिल्याने मनसेची सदस्य संख्या २७ झाली आहे. पालिकेतली इतर पक्षांची सदस्य संख्या पाहता मनसे दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे विरोधी पक्षनेतेपद मनसेला द्यावे, अशी मागणी शिंदे यांनी महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे केली आहे.

काँग्रेसचे संख्याबळ कमी असताना पोटनिवडणुकीला सामोरे जाऊन निवडणूक लढवून आम्ही विरोधी पक्षनेतेपद मिळविले होते. मनसेमध्ये हिंमत असेल तर त्यांनी निवडणूक लढवून हे पद मिळवावे. पक्षाच्या सहा सभासदांना बडतर्फ करण्याचा ठराव मांडलेला आहे; अद्याप बडतर्फ केलेले नाही.

अरविंद शिंदे, विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेतेपद द्यावे, असे पत्र मनसेने पाठविले आहे. प्रचलित कायदा तपासून नगरसचिवांकडून सदस्य संख्येची माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.

प्रशांत जगताप, महापौर

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *