facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / पालकांना ‘व्हॉट्सअॅप’वर गृहपाठ समजणार!

पालकांना ‘व्हॉट्सअॅप’वर गृहपाठ समजणार!

इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांसमोर मराठी शाळांचा ‌टिकाव लागतो की नाही, अशी परिस्थिती असताना पेरुगेट येथील मुलांच्या भावे हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेने ‘डिजिटल होमवर्क’ (गृहपाठ) ही नावीन्यपूर्ण संकल्पना आणली आहे. शिक्षकांनी दिलेल्या गृहपाठाची माहिती पालकांना व्हावी आणि विद्यार्थ्यांनी ते करावे यासाठी शाळेने ‘स्मार्टफोन’ व ‘व्हॉट्सअॅप’चा प्रभावी वापर केला आहे. त्या अंतर्गत शाळेतील सुमारे अठराशे विद्यार्थ्यांचा वर्गांनुसार त्यांच्या पालकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक्स यंत्रणेद्वारे घेऊन या शाळेने राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यातील पुढील टप्पा म्हणून ‘डिजिटल होमवर्क’चा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामध्ये वर्गशिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे ‘व्हॉट्सअॅप’वर ग्रुप तयार केले आहेत. ग्रुपमध्ये आठवड्याचे गृहपाठ दिवसानुसार टाकण्यात येणार आहेत. त्यामध्ये सोमवारी, मंगळवारी भाषा विषयाचे, बुधवारी, गुरुवारी इतिहास आणि भूगोलचा गृहपाठ देण्यात येणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारी विद्यार्थ्यांना तुलनेने अवघड वाटणाऱ्या गणित आणि विज्ञान या विषयांचे गृहपाठ टाकण्यात येईल. त्यामुळे रविवारी ते करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळेल, असे प्राचार्य के. एन. अर्ना‍ळे यांनी सांगितले.
‘डिजिटल होमवर्क’ संकल्पना राबविण्यासाठी इयत्ता पाचवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वर्गांनुसार सुमारे ३५ ग्रुप तयार केले आहेत. यात सुमारे अठराशे विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांला काय गृहपाठ दिला आहे, याची माहिती होईल. या प्रत्येक ग्रुपवर वर्गशिक्षकांचे नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत काय गृहपाठ दिला जातो, याची माहिती मिळेल. त्याचबरोबर आपला पाल्य शाळेत दिलेला गृहपाठ करतो की नाही, याकडेही लक्ष ठेवता येणार आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या तुलनेत मराठी शाळाही मागे नाहीत, त्यामुळेच ‘बायोमेट्रिक्स’ आणि ‘डिजिटल होमवर्क’ सारखे प्रयोग राबविण्यात येत आहे.

आज, शुक्रवारी माजी विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत या संकल्पनेचा शुभारंभ होईल, असेही अर्नाळे यांनी सांगितले.

शाळेत दिल्या जाणाऱ्या गृहपाठाची माहिती विद्यार्थी त्यांच्या पालकांना देत नाहीत. त्यामुळे पालकसभेत पालक शिक्षक विद्यार्थ्यांना गृहपाठच दिला जात नसल्याच्या तक्रारी करतात. हे लक्षात आल्यानंतर, शाळेतील किती पालकांकडे स्मार्टफोन आहेत, याची माहिती घेण्यात आली. त्यानंतर डिजिटल होमवर्क ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना होईल, अशी आशा आहे.
– के. एन. अर्नाळे, प्राचार्य

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *